पहिल्याच दिवशी उलाढाल थंडावली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

पुणे : जीएसटी शनिवारी लागू झाला आणि त्याबाबतचा सल्ला घेण्यासाठी अनेकांनी सनदी लेखापाल, कर सल्लागारांना गाठले... व्यापारीवर्ग त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ते बदल करण्यात गुंतलेला... पहिल्याच दिवशी बाजारातील उलाढालही तुलनेने थंडावलेलीच... पुढील आठवड्यात सर्व व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुणे : जीएसटी शनिवारी लागू झाला आणि त्याबाबतचा सल्ला घेण्यासाठी अनेकांनी सनदी लेखापाल, कर सल्लागारांना गाठले... व्यापारीवर्ग त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ते बदल करण्यात गुंतलेला... पहिल्याच दिवशी बाजारातील उलाढालही तुलनेने थंडावलेलीच... पुढील आठवड्यात सर्व व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्यापाऱ्यांमध्ये अद्याप संभ्रम
गेली दहा वर्षे चर्चेत असलेला जीएसटी अखेर लागू झाला. उत्पादक, व्यापारी, ग्राहक यांच्यापर्यंत अद्याप या कायद्याबाबतचा तपशील पोचलेलाच नाही. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उर्वरित साठा कोणत्या भावांत विकायचा याविषयी स्पष्टता नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि जीएसटी मधील कर परतावा सादर करण्याबाबत व्यापारी, उत्पादक कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्याशी चर्चाही करीत आहेत.

दोन- तीन दिवसांत दरनिश्‍चिती
व्यवहारासाठी दुकानातील संगणक प्रणालीत बदल करावा लागणार असून, ही प्रणाली बदलून देणाऱ्या संस्था, त्यांचे संगणक अभियंते हे व्यग्र झाले आहेत. प्रत्येक मालाची विक्री करताना त्याचा "कोड'हा बिलात नमूद करावा लागणार आहे. या "कोड'विषयी माहिती मिळाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कराची टक्केवारी हाती आल्यानंतर प्रत्यक्षात मालाची किंमत किती होईल, त्याचे दर ठरविण्याचे काम येत्या दोन- तीन दिवसांत पूर्ण होईल असे व्यापारी सांगत आहेत.

"किरकोळ'वर परिणाम नाही
उत्पादक "जीएसटी' भरणार की खरेदीदारांनी तो भरायचा, याचा खुलासा उत्पादकांकडून होत नाही, त्याचाही परिणाम जाणवत आहे. पुढील आठवड्यात प्राथमिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, असा विश्‍वास व्यापाऱ्यांना वाटत आहे. शनिवारी बाजारातील दैनंदिन उलाढाल तुलनेत कमी असली तरी काही प्रमाणात व्यवहार थांबल्याचे दिसून आले. किरकोळ विक्रेत्यांकडे मात्र हा परिणाम जाणवला नाही.

कार्यालयाचे नामकरण
विक्रीकर भवन आणि केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयांचे आता वस्तू व सेवा कर भवन (जीएसटी भवन) असे नामकरण झाले आहे. या विभागातर्फे शनिवारी जीएसटी दिन साजरा केला गेला. जीएसटीविषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिलेल्या हेल्पलाइन ई- मेल आयडीला उत्तरे पाठविण्याचे कामही सुरू आहे.

Web Title: pune news gst and market