गणेश मंडळांवर "जीएसटी'चा बोजा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) बोजा यंदाच्या गणेशोत्सवावरही पडणार आहे. कारण, अहवाल छपाई, मांडव उभारणी, देखावा, साऊंडसिस्टिमवर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची कर आकारणी जवळपास दुप्पट वाढली आहे. त्यामुळे मंडळांच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यातच बहुतांश मंडळांनी वर्गणी मागणे बंद केले आहे. त्यामुळे तुटपुंज्या गंगाजळीवरच उत्सव साजरा करावा लागणार आहे. 

पुणे - वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) बोजा यंदाच्या गणेशोत्सवावरही पडणार आहे. कारण, अहवाल छपाई, मांडव उभारणी, देखावा, साऊंडसिस्टिमवर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची कर आकारणी जवळपास दुप्पट वाढली आहे. त्यामुळे मंडळांच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यातच बहुतांश मंडळांनी वर्गणी मागणे बंद केले आहे. त्यामुळे तुटपुंज्या गंगाजळीवरच उत्सव साजरा करावा लागणार आहे. 

केंद्र सरकारने एक जुलैपासून देशात जीएसटी लागू केला. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे. दरवर्षीच उत्सवादरम्यान विविध वस्तूंच्या दरामध्ये पाच-दहा टक्के वाढ झाल्याचे जाणवते; परंतु यंदा मांडव, सजावट खर्च, साऊंड सिस्टिम तसेच अहवाल छपाईसाठी मंडळांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. कारण छपाई, वीज, साऊंड सिस्टिम व मांडवावर 18 टक्के जीएसटी लावला आहे. गेल्यावर्षी अहवाल छपाईसाठी सहा टक्के कर द्यावा लागत होता. मांडव व साउंड सिस्टिमसाठी 15 टक्के कर द्यावा लागत होता. यंदा फायबरच्या वस्तूंवरही 28 टक्के जीएसटी लावल्याचे समजते. त्यामुळे देखाव्यांसाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच जिवंत देखावे करायचे म्हटले तर कलाकारही मानधन वाढवून मागतात. 

पुणे शहरात साधारणतः चार हजारांच्या आसपास नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत. त्यातही एक हजारच्या आसपास मंडळांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात असते. लाखोंच्या पटीत मंडळांचे दरवर्षीचे आर्थिक जमा-खर्चाचे नियोजन असते. काही मंडळे अधिकृतपणे त्यांच्या जमा-खर्चाचा अहवाल सादर करतात. काही मंडळे करविवरणपत्रेही भरतात. असे असताना जीएसटीमुळे मंडळांवर अतिरिक्त बोजा पडणार असल्याने कार्यकर्त्यांनी हात आखडता घेत खर्च करावा लागणार आहे. 

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा म्हणाले, ""गेल्यावर्षी मंडळाला एक हजार अहवाल छपाईचा खर्च 61 हजार आला होता. यंदा 74 हजार 700 चे कोटेशन दिले आहे. मांडवाचा खर्च 1 लाख 61 हजार रुपये आला होता. यंदा तीन लाखांचे कोटेशन दिले आहे. खरंतर गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे मंडळांना जीएसटीचा फटका बसू नये. कारण, प्रत्येक मंडळाची आर्थिक स्थिती भक्कम असेलच असे नाही.'' 

सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते म्हणाले, ""जाहिराती, वर्गणी मिळणे मुश्‍कील झाले आहे. तेव्हा मंडळांना बिले देणे त्रासाचे होण्याची शक्‍यता आहे. मोठे मांडववाले मंडळांकडूनच जीएसटी वसूल करतील.'' मूर्तिकार नीलेश पार्सेकर म्हणाले, ""दरवर्षीच गणेश मूर्तींच्या दरात वाढ होते. यंदा जीएसटीचा गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये परिणाम जाणवतोय.'' 

वास्तविक कर हा नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात येतो. तो स्वीकारणे आपले कर्तव्य आहे. जीएसटी ही एक व्यवस्था आहे. त्यातून सर्वांनाच जावे लागेल. गणेश मंडळांनाही बिले भरावी लागतील. 
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

Web Title: pune news GST Ganesh mandal