"वाहेगुरुजी'चा प्रशाद.... लाखो भाविकांकडून लंगरचा आस्वाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजींची 549 वी जयंती शहर व उपनगरांतील गुरुद्वारांमध्ये शनिवारी (ता. 4) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त अखंड पाठवाचन झाले. विशेष म्हणजे शहर व उपनगरांतील गुरुद्वारांमध्ये अमृतसर, जम्मू- काश्‍मीरसह विविध प्रांतातून कीर्तनकारांचे जथ्थे आले आहेत.

पुणे : कार्तिक पौर्णिमेचा मुहूर्त. गुरुनानक यांची जयंती. भजन, कीर्तनात रममाण झालेले भाविक. गुरुग्रंथसाहिबच्या दर्शनाकरिता गुरुद्वारांमध्ये सर्वधर्मीय नागरिकांची आवर्जून उपस्थिती आणि "ओ बे बिठ्ठल, एबे बिठ्ठल, बिठ्ठल बिन संसार नही', "संसार समुंदे तार गोविंदे तार ले बाप बिठ्ठल' गुरुबाणीतले संत नामदेवांचे अभंग गात... वाहेगुरुजी प्रशाद... वाहेगुरुजी प्रशाद म्हणत भाविकांना आग्रह करणारे सेवेकरी... आणि "वाहेगुरू'च्या नामस्मरणात गुरुद्वारांमध्ये लाखो भाविकांनी लंगरचा आस्वाद घेतला. 

शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजींची 549 वी जयंती शहर व उपनगरांतील गुरुद्वारांमध्ये शनिवारी (ता. 4) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त अखंड पाठवाचन झाले. विशेष म्हणजे शहर व उपनगरांतील गुरुद्वारांमध्ये अमृतसर, जम्मू- काश्‍मीरसह विविध प्रांतातून कीर्तनकारांचे जथ्थे आले आहेत. शीख धर्मीयांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांत दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, हिमाचल प्रदेशातून कीर्तनकारांचे जथ्थे आमंत्रित करण्यात येतात. त्यामध्ये महिला कीर्तनकारांचा समावेश असतो. अमृतसर येथे कीर्तनकारांसाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात येते. वय वर्ष तीनपासून मुले- मुली आवर्जून प्रशिक्षण घेतात. 

गुरुनानक जयंतीनिमित्ताने सकाळपासूनच गुरुद्वारांमध्ये भाविकांची रीघ लागली होती. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात लंगरमध्येही सेवाभावी वृत्तीने तरुणवर्गही सहभागी झाला होता. सेवेकरी भाविकांच्या सेवेत व्यग्र होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही गुरुद्वारांमध्ये जाऊन गुरुग्रंथसाहिबच्या दर्शनाचा लाभ घेतला. लष्कर भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी म्हणाले, ""सर्वधर्मीय नागरिक लंगरमध्ये सहभागी झाले होते. जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले. नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.'' विश्‍वस्त अवतारसिंग आनंद म्हणाले, ""गव्हाचे पीठ, साजूक तुप, साखरमिश्रित कडाप्रसाद प्रत्येक गुरुद्वारात असतोच. स्वतःहून भाविक लंगरसाठी मदत करतात. दिवसभर विविध गुरुद्वारांमध्ये हजारो भाविक लंगरमध्ये भोजन करतात. यानिमित्ताने भाविकांसाठी अन्नदानाची सेवा पुरविता येते. भोजनात डाळ, पुलाव, तांदळाची खीर आणि फळे यांसारखे विविध पदार्थ असतात.''

Web Title: Pune news Guru Nanak Jayanti