गुटखाबंदीवर ठोस अंमलबजावणी कधी?

अनिल सावळे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पोलिस आणि अन्न व औषधद्रव्य (एफडीए) प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत विविध ठिकाणी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला. परंतु, काही पानटपऱ्यांवर गुटख्याची अद्यापही खुलेआम विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे. तरुणाईला कॅन्सरच्या विळख्यात ओढणारा हा गुटखा नेमका कोठून आणि कसा येतो, याचा मुळापर्यंत शोध घेऊन त्यावर संबंधित यंत्रणांनी आळा घालण्याची गरज आहे.

पोलिस आणि अन्न व औषधद्रव्य (एफडीए) प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत विविध ठिकाणी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला. परंतु, काही पानटपऱ्यांवर गुटख्याची अद्यापही खुलेआम विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे. तरुणाईला कॅन्सरच्या विळख्यात ओढणारा हा गुटखा नेमका कोठून आणि कसा येतो, याचा मुळापर्यंत शोध घेऊन त्यावर संबंधित यंत्रणांनी आळा घालण्याची गरज आहे.

राज्यात गुटखाबंदीचा निर्णय जाहीर करून काही वर्षे लोटूनही पुण्यात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी (दक्षिण) पथकाने गुटखा विक्रेत्यांवर बुधवारी कारवाई केली. कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर गुटख्याने भरलेला टेंपो जप्त केला. त्यात एम. गोल्ड, विमल, आरएमडी आणि सुगंधी मिक्‍स सुपारीचा साडेआठ लाख रुपयांचा साठा होता. पोलिसांनी कोथरूडमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी हा गुटखा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गुटखा विक्री रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, ‘एफडीए’ प्रशासनाकडूनही गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. ‘एफडीए’ प्रशासनाने येरवडा आणि खराडी परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानावर एकाच दिवशी छापे टाकून १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या धडक कारवाईवरून ‘एफडीए’ प्रशासनाच्या गुटखाविरोधी कारवाईने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

अशी होते गुटखाविक्री....
काही गुटखा विक्रेत्यांनी पोलिसांना तपासात जी माहिती दिली त्यानुसार, राज्यात कर्नाटक आणि गुजरातच्या सीमेवरून गुटखा आणला जातो. काही स्थानिक व्यापाऱ्यांकडून गुटखा खरेदीसाठी ठोक व्यापाऱ्याकडे ‘ऑर्डर’ केली जाते. त्यावर ठोक व्यापाऱ्यांकडून त्यांना दोन-चार दिवसांत मालाची व्यवस्था होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर ठोक व्यापारी फोनवर अचानक विशिष्ट ठिकाणी अर्ध्या तासांत टेंपो घेऊन या, असे सांगतो. तेथे टेंपो घेऊन गेल्यानंतर ठोक व्यापाऱ्यांमार्फत आलेली व्यक्‍ती दुचाकीवर येते. ती व्यक्‍ती तेथे दुचाकी ठेवून टेंपो घेऊन जाते. टेंपो घेऊन आलेल्या लोकांना गोडाऊनची माहिती होऊ नये, यासाठी त्यांना सोबत घेतले जात नाही. सुमारे एक तासानंतर ती व्यक्‍ती टेंपोत गुटखा भरून संबंधित व्यापाऱ्याकडे तो माल देते. त्यानंतर तो माल किरकोळ आणि पानटपरी विक्रेत्यांकडून विकण्यात येतो. सध्या ठोक गुटखा व्यापाऱ्यांकडून ही पद्धत (मोडस) वापरण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

साडेपाच कोटींचा गुटखा सहा महिन्यांत जप्त
‘एफडीए’ प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत ९२ ठिकाणी छापे टाकले. त्यात पुण्यात २७ ठिकाणी, सातारा २१, सांगली ९, सोलापूर ४२ आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत पाच कोटी ६८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारीचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती ‘एफडीए’चे पुणे विभागाचे सहआयुक्‍त शिवाजी देसाई यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Web Title: pune news gutkha ban implementation