जिल्हा उपरुग्णालयात दिव्यांगांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - जिल्ह्यातील दिव्यांगांची त्यांच्या व्यंगाबाबतचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वोपचार केंद्रात होणारी फरफट कायमस्वरूपी थांबणार आहे. यापुढे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उपरुग्णालयांमध्येच तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर आठ दिवसांत दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.

पुणे - जिल्ह्यातील दिव्यांगांची त्यांच्या व्यंगाबाबतचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वोपचार केंद्रात होणारी फरफट कायमस्वरूपी थांबणार आहे. यापुढे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उपरुग्णालयांमध्येच तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर आठ दिवसांत दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.

यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव), भोर, दौंड, बारामती आणि इंदापूर या पाच जिल्हा उपरुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. या नवीन आरोग्य सुविधेचे उद्‌घाटन येत्या शनिवारी (ता. ३०) इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते इंदापूर जिल्हा उपरुग्णालयात होणार आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आदी उपस्थित राहणार असल्याचेही माने यांनी सांगितले. 

खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांचीही भेट घेऊन, त्यांना दिव्यांगाना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती देण्यात आली होती. जिल्ह्यातील दिव्यांगांना भल्या पहाटे ससून किंवा औंध येथील जिल्हा 
रुग्णालयात येणे शक्‍य होत नाही. त्यातच पहाटेपासून रांगा लावून कूपन घ्यावे लागत असे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक असलेल्या तपासण्या करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी राव यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना आदेश दिला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी या नव्या आरोग्य योजनेस तत्काळ मंजुरी दिली. 

माने म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २४ जिल्हा उपरुग्णालये आहेत. यामध्ये अनुक्रमे किमान ५०, १०० आणि १०० पेक्षा अधिक खाटांची सुविधा असलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात किमान १०० किंवा त्यापेक्षा अधिक खाटांची सुविधा असलेल्या रुग्णालयांची या नव्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका या दोन्ही कागदपत्रांची प्रत्येकी एक झेरॉक्‍स आणि दोन रंगीत छायाचित्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. या जिल्हा उपरुग्णालयांमध्ये दरमहा एक दिवस ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तपासणीनंतर आठ दिवसांत संबंधिताला ‘दिव्यांग प्रमाणपत्र’ मिळू शकणार आहे.’’ 

तपासणीसाठी निश्‍चित केलेला दिवस 
मंचर      दर महिन्याचा पहिला शुक्रवार 
भोर      महिन्याचा दुसरा शुक्रवार 
दौंड      महिन्याचा तिसरा शुक्रवार 
बारामती      महिन्याचा चौथा शुक्रवार 
इंदापूर      महिन्याचा पहिला बुधवार

Web Title: pune news handicaped cheaking in district hospital