डेबिट कार्डद्वारे "हायटेक' चोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - बनावट डेबिट कार्डचा वापर करून दोन लाख रुपये चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्‍यता आहे. शहरातील दहा एटीएम केंद्रांत आरोपीने "स्कीमर' बसविल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 

पुणे - बनावट डेबिट कार्डचा वापर करून दोन लाख रुपये चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्‍यता आहे. शहरातील दहा एटीएम केंद्रांत आरोपीने "स्कीमर' बसविल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 

या गुन्ह्यात कोरेगाव पार्क पोलिसांनी करण मेहर सोनार (वय 38, रा. वरळी पार्क, मीरा रोड, मुंबई) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 23 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपीने महंतकुमार कांचन तिवारी (रा. कोरेगाव पार्क) यांचे बनावट एटीएम कार्ड तयार करून त्यांच्या बॅंक खात्यातून मुंबईतील जोगेश्‍वरी आणि अंधेरी येथील "एटीएम' केंद्रातून प्रत्येकी एक लाख रुपये काढले. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला. 

पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन मोबाईल, आयसीआयसीआय, कोटक, एडीबीसी बॅंकेचे डेबिट कार्ड, मॅग्नेटिक (काळी) पट्टी असलेली 19 कार्डे, हिरव्या रंगाचे स्कीमर, दोन पीनहोल कॅमेरा सेट, बॅटरी चार्जर आदी वस्तू जप्त केल्या आहेत. त्याच्याकडे रिकामी डेबिट कार्डेदेखील मिळाली आहेत. बनावट स्कीमर आणि एटीएम यंत्राजवळ सूक्ष्म कॅमेरा लावून मिळविलेल्या पासवर्डद्वारे चोरी केली जाते. 

आरोपीला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. आरोपीने एकट्याने हा गुन्हा केला नसून, सईद सय्यद, अँड्य्रू नायर, सज्जाद नावाच्या व्यक्तींनी त्याला मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपीने बनावट एटीएम कार्ड कोठे तयार केले, त्याला कोणी मदत केली, हे कार्ड तयार करण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले आणखी साहित्य त्याच्याकडून जप्त करायचे आहे, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीचे गुजरात, दिल्ली, कोलकता येथे जाळे पसरल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी न्यायालयाकडे केली होती. 

"स्कीमर'चे कार्य 
एटीएममधील यंत्रात "स्कीमर' हे यंत्र बसविले जाते. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप केल्यानंतर "स्कीमर' हे कार्डमधील काळ्या पट्टीत माहिती साठविते. 

Web Title: pune news Hi-Tech theft by debit card