ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा प्राप्त होणार झळाळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या वास्तूंचा अद्‌भुत खजिना उलगडण्यासाठी महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 28.90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने हेरिटेज सेलसाठी यंदा पहिल्यांदाच अशी भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे 2018 अखेरीस शहरातील बहुतांश ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा झळाळी प्राप्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

पुणे - वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या वास्तूंचा अद्‌भुत खजिना उलगडण्यासाठी महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 28.90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने हेरिटेज सेलसाठी यंदा पहिल्यांदाच अशी भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे 2018 अखेरीस शहरातील बहुतांश ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा झळाळी प्राप्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सध्या लाल महाल, नाना वाडा, विश्रामबागवाडा या वास्तूंची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यानिमित्ताने "सकाळ'च्या वतीने शहरातील ऐतिहासिक वास्तूंची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी करण्यात आली. 

लाल महाल 
या ऐतिहासिक वास्तूचे अवतीभवती दगड आणि चुना वापरून सुरक्षा भिंत बांधण्याचे काम चालू आहे. या भिंतीचे जवळपास 80 टक्के काम झाले आहे. संवर्धनाच्या नियोजनानुसार महालाचे प्रवेशद्वार आता शनिवारवाड्याच्या बाजूने असणार आहे. प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून, केवळ एका बाजूच्या भिंतीचे काम राहिले आहे. नियोजनानुसार दगडी सुरक्षा भिंत बांधण्यात येत असून, संग्रहालयांतर्गत विविध सुशोभीकरणाची कामे केली जात आहेत. 

नाना वाडा 
वाड्यातील दरबार हॉलचे आणि दर्शनी वाड्याचे जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक वास्तूमधील उर्वरित टप्प्यामधील कामे येत्या वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत. वास्तूच्या तळमजल्यावरील दालनामध्ये आद्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रावर आधारित कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात (फेज वन) सात दालनांमध्ये संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. वाड्यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, डागडुजीचे काम हाती घेतले आहे. वाड्याला नवीन कौले बसविण्यात येणार आहेत. 

विश्रामबागवाडा 
या वास्तूतील जतन संवर्धनाची कामेही वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत. या वाड्याच्या संवर्धन कामातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू आहे. वाड्यातील ग्रंथालयाचेही जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. 

""शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम वेगाने व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाना वाड्यात क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात क्रांतिकारकांचा जीवनपट ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय काही चित्रांचाही यात समावेश असेल. लाल महालामध्येही पहिल्या मजल्यावर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात मांडण्याचा विचार आहे. मात्र अद्याप हा निर्णय प्रस्तावित आहे. महालाच्या गच्चीवरही खुले संग्रहालय साकारण्यात येणार आहे. विश्रामबागवाड्याच्या संवर्धनाचे कामही वेगाने सुरू आहे.'' 
- हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता, हेरिटेज सेल  

अंदाजपत्रकानुसार आगामी काळात (2018-19मध्ये) करण्यात येणारी कामे :- 
- महात्मा फुले मंडईचे जतन संवर्धन व इतर कामे करणे 
- विश्रामबागवाडा येथील तिसऱ्या टप्प्यातील संवर्धनाची कामे 
- नानावाडा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या दालनामध्ये आद्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रावर आधारित कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करणे 

Web Title: pune news Historical place