फेरीवाला धोरणासाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - रखडलेल्या फेरीवाला पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत राजकीय सहमती निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असून, तिची पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या जागा, त्यांचे भाडे इत्यादींबाबतचे धोरण ही समिती निश्‍चित करणार आहे.

पुणे - रखडलेल्या फेरीवाला पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत राजकीय सहमती निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असून, तिची पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या जागा, त्यांचे भाडे इत्यादींबाबतचे धोरण ही समिती निश्‍चित करणार आहे.

शहरातील स्टॉल, पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांचे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्रे दिली आहेत. शहरात अधिकृत १७ हजार ३८० व्यावसायिक आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून शहरातील २८८ जागाही निश्‍चित केल्या आहेत. जागांसाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण निश्‍चित केले आहे.

या व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार तीन बाय सहा, चार बाय पाच आणि आठ बाय चार फुटांच्या जागांवर त्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दररोज पाच ते १५० रुपये भाडे आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे; परंतु याबाबतचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. 

फेरीवाल्यांच्या जागा आणि त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडे, हा त्यात कळीचा मुद्दा आहे. राजकीय पक्षांमध्ये त्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे हा ठराव अद्याप मंजूर झालेला नाही. परिणामी पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महापौरांनी सर्वच पक्षांना नुकतेच एक पत्र लिहिले आहे. राजकीय पक्षांनी एक सदस्याचे नाव समितीसाठी सुचवायचे आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचाही त्यात समावेश असेल. फेरीवाला धोरणाच्या पुनर्वसनासाठी ही समिती चर्चा करून निर्णय घेईल, त्यानुसार अंमलबजावणी होईल. शहरासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रश्‍न राजकीय सहमतीने सोडविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. 
 

फेरीवाला समितीची आज बैठक 
शहरातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन रखडलेले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची बैठक बुधवारी दुपारी आयुक्त कार्यालयात होणार आहे. आयुक्तांसह समितीचे १२ सदस्य, महापालिकेतील संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. ‘नो हॉकर्स झोन’मध्ये आणखी दोन रस्त्यांचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर या वेळी चर्चा होईल. दरम्यान, फेरीवाला समितीच्या बैठका सातत्याने घेऊन त्यातील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहर फेरीवाला समितीचे सदस्य संजय शंके यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. 

Web Title: pune news hockers policy committee