अभिजात संगीतातील होळीचं आजही रसिकांना आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पुणे - भारतीय अभिजात संगीतातील पारंपरिक होळीची रसिकांना आजही प्रचंड भुरळ पडते. राधा, कृष्ण व गोपींच्या माध्यमातून रसिक जणू स्वत- भावभावनांच्या रंगांमध्ये न्हाऊन निघतात. कथकसारख्या नृत्यशैलीतून व गाण्याच्या मैफलींमध्येही "होरी'ला लक्षणीय प्रतिसाद मिळतो, असे ज्येष्ठ कथक नृत्यांगना नीलिमा अध्ये व शास्त्रीय गायक नागेश आडगावकर यांनी सांगितले. 

पुणे - भारतीय अभिजात संगीतातील पारंपरिक होळीची रसिकांना आजही प्रचंड भुरळ पडते. राधा, कृष्ण व गोपींच्या माध्यमातून रसिक जणू स्वत- भावभावनांच्या रंगांमध्ये न्हाऊन निघतात. कथकसारख्या नृत्यशैलीतून व गाण्याच्या मैफलींमध्येही "होरी'ला लक्षणीय प्रतिसाद मिळतो, असे ज्येष्ठ कथक नृत्यांगना नीलिमा अध्ये व शास्त्रीय गायक नागेश आडगावकर यांनी सांगितले. 

नीलिमाताई म्हणाल्या, "प्रख्यात कथक कलावंत व गुरू पंडिता रोहिणी भाटे ऊर्फ बेबीताई यांच्याकडून आम्हा शिष्यांना होरी या प्रकाराचे सखोल शिक्षण मिळाले. पंडित कुमार गंधर्वांच्या स्वरांतील "तारी दे, दे गारी' या बंदिशीवरील त्यांनी बसवलेली नृत्यरचना लाजवाब होती. उपशास्त्रीय पद्धतीचं तंत्र कायम ठेवून त्यात लोकजीवनाचा स्वाद जपत ही होरी त्यांनी बसवली होती. नायिकेचे ते होळी खेळणे बेबीताई दर वेळी निरनिराळ्या प्रकारे दाखवायच्या. मीही माझ्या प्रस्तुतीतून तेच साध्य करण्याचा प्रयत्न करते. कधी एकल तर कधी सामूहिकपणे सादर करायच्या किती तरी रचनांमधून मी आणि माझ्या सहकलावंतांना आजही होळी खूप आनंद देऊन जाते. "होरी'ला देश- परदेशात दाद मिळते. रसिकांकडूनही मोठ्या प्रमाणात दाद मिळते.' 

नीलिमाताई म्हणाल्या , "होरी ही नृत्यातून आनंदलहरींची उन्मुक्त उधळण करण्यासाठी पर्वणीच असते. म्हणून की काय, होळीच्याच काळात फक्त नव्हे तर एरवीही होरीतं सादरीकरण हे कलावंत आणि रसिकांना मोह घालतं. खरं तर होरीचं नृत्यासाठीचं कथानक प्रेक्षकांना माहीत असतंच. तरीही त्यांना ती पुन-पुन्हा पाहावीशी वाटते, कारण कृष्ण आणि राधेची लपाछपी, स्वत-ला रंग लावू न देता दुसऱ्याला फसवून रंग लावणं, गोपींची दंगामस्ती, जल्लोश वगैर त्या नवनव्या आविष्कारात कलावंत व रसिकांना गंमत वाटते. त्यामुळे वेळोवेळी त्यातला ताजेपणा हा कळीचा मुद्दा ठरतो. शास्त्रीय संगीतातली "होरी' तिच्या कल्पकतेच्या गुणधर्मामुळे शतकं लोटली तरी अजूनही ताजी वाटते. उत्तर प्रदेशच्या लोकजीवनातून आपल्या अभिजात संगीतात आलेला हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार पाश्‍चात्य रसिकांच्याही कुतूहलाचा विषय ठरतो आहे.. 

आडगावकर हे प्रसिद्ध अभिजात गायक उस्ताद राशिद खॉं यांचे शिष्य. ते म्हणाले, "बसंत रागातील "पिया संग खेलूँ होरी' किंवा छायानट रागातील ' रंगन पिचकारी डारी' या बंदिशी शास्त्रीय संगीताच्या दर्दी श्रोत्यांबरोबरच सर्वसामान्य श्रोत्यांनाही रिझवतात. माझे गुरुजी म्हणतात की, "होळीचा दिवस हा उजाडल्यापासून मावळेपर्यंत ऊर्जेनं भारून टाकणारा असतो. हे लक्षात घेऊन गा.' 

पारंपरिक बंदिशी गाताना पूर्वी बुजुर्गांनी अशी काही स्वरवाक्‍यं वापरली की, त्यांच्यात वेगवेगळे रंग जाणवतात. माझ्यासारखा आजच्या पिढीच्या गायकांना गाताना अवचितच नवे रंग गाण्यात सुचतात. रसिकांना पारंपरिकबरोबर तेही आवडते, असं सांगून आडगावकर म्हणाले, " रागदारीतील होळीच्या वर्णनात्मक बंदिशीपेक्षा होरी या उपशास्त्रीय गानप्रकारात अंतरे जास्त असल्यानं तो "मूड' खुलवायची मुभा जास्त असते. होरीच्या काही रचना अतिशय प्रसन्नतेची पखरण करणाऱ्या तर काहींमध्ये मात्र विरहभावना असते. कथकसाठी गायनसाथ करताना वेगळाच अनुभव मिळतो. लग्गी, नाडा सुरू झाल्यावर विरहिणी नायिका कल्पनेत होरी खेळू लागते. सुखावते. परमेलू सुरू झाल्यावर पुन्हा मूळ विरही अवस्थेत ती परतते. हे सारे आविष्कार रसिकांना मनापासून हवेहवेसे वाटतात.' 

Web Title: pune news holi festival music