बारावीत मुलींची बाजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

शहराचा ९४, तर १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

शहराचा ९४, तर १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

पिंपरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.२० टक्‍के लागला. या परीक्षेत ९५.४६ टक्‍के विद्यार्थिनी, तर ८९.५९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील १३ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्‍के लागला असून त्यात शास्त्र, वाणिज्य आणि कला शाखांचा समावेश आहे. सात महाविद्यालयात फक्‍त शास्त्र शाखेचा तर पाच महाविद्यालयातील वाणिज्य शाखांचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. येत्या नऊ जूनला दुपारी तीन वाजता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे मंडळाकडून कळविण्यात आले आहे. 

बारावीच्या परीक्षेसाठी शहरातून १५ हजार ५२० विद्यार्थांना नावनोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार २११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ६८१ विद्यार्थी डिस्टिक्‍टशन, सहा हजार ६७१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, पाच हजार ३४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि एक हजार ६३० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

‘शंभर टक्के’ची महाविद्यालये 
डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर महाविद्यालय (चिंचवड), निर्मल बेथनी हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय (काळेवाडी), शिवभूमी विद्यालय (यमुनानगर), अमृता ज्युनिअर महाविद्यालय (निगडी), सेंट उर्सुला ज्युनिअर महाविद्यालय (आकुर्डी), कमलनयन बजाज ज्युनिअर महाविद्यालय (चिंचवड), प्रियदर्शनी ज्युनिअर महाविद्यालय (भोसरी), होरायझन इंग्रजी माध्यम शाळा (दिघी), सरस्वती विश्‍व विद्यालय (निगडी), सिटी प्राइड ज्युनिअर महाविद्यालय (निगडी),  सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय (रावेत),  एस. बी. पाटील महाविद्यालय (रावेत), सरस्वती हायस्कूल (पवनानगर) या महाविद्यालयातील शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा ज्युनिअर महाविद्यालय (निगडी), श्री स्वामी समर्थ ज्युनिअर महाविद्यालय (भोसरी), अभिमान ज्युनिअर महाविद्यालय (निगडी), के. जी. गुप्ता ज्युनिअर महाविद्यालय (चिंचवड), मॉडर्न हायस्कूल (निगडी), नागनाथ मारुती गडसिंग ज्युनिअर महाविद्यालय (चिंचवड), संचेती ज्युनिअर महाविद्यालय (थेरगाव) या महाविद्यालयातील फक्‍त शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. 
रामचंद्र गायकवाड विद्यालय (दिघी),  डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर महाविद्यालय (निगडी), सेंट ॲन्स ज्युनिअर महाविद्यालय  (निगडी), एस. एन. बी. पी. ज्युनिअर महाविद्यालय (रहाटणी), नोव्हल ज्युनिअर महाविद्यालयात फक्‍त वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. 

‘चापेकर’चा निकाल ३५ टक्के
चिंचवडच्या क्रांतिवीर चापेकर हायस्कूलमधून कला शाखेच्या १४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात फक्‍त पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यामुळे महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ३५.७१ टक्‍के लागला. पिंपळे गुरवमधील किलबिल हायस्कूलमधून शास्त्र शाखेच्या आठ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील फक्‍त तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शास्त्र शाखेचा निकाल ३७.५० टक्‍के लागला.

लोणावळा केंद्राचा निकाल ८४ टक्के

लोणावळा - उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत लोणावळा केंद्राचा निकाल ८३.९३ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टक्का घसरला आहे. तुंगार्लीतील डॉन बास्को हायस्कूल व ऑल सेंट चर्च हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत लोणावळा विभागात यंदा नवीन एक हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी एक हजार तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्हीपीएसच्या डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ९१.५८ टक्के; तर वाणिज्य शाखेचा ९२.९४ टक्के लागला आहे. ७९९ पैकी ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण टक्केवारी ९२.४६ आहे. लोणावळा महाविद्यालयाचा निकाल सर्वांत कमी ४२ टक्के लागला. लोणावळा केंद्रात कला, वाणिज्य तसेच शास्त्र शाखांमध्ये मुलींनी आघाडी घेतली आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या तुंगार्ली येथील डॉन बास्को विद्यालयातील १६७; तर ऑल सेंट चर्चचे ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: pune news hsc result declare