पुणे: पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास

जनार्दन दांडगे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा मुळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती किसन रामा कांबळे (वय ३५, रा. केम, ता. करमाळा) याने पत्नीच्या हत्तेनंतर काही वेळातच सुवर्णा हिच्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

पुणे : लोणी काळभोर येथे घरगुती वादाला कंटाळून पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माळीमळा येथे आज (बुधवारी) पहाटे घडली.

सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा मुळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती किसन रामा कांबळे (वय ३५, रा. केम, ता. करमाळा) याने पत्नीच्या हत्तेनंतर काही वेळातच सुवर्णा हिच्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुवर्णा व किसन हे मागील सात वर्षापासून घरगुती भांडणामुळे वेगळे राहत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. किसन याने आठ ते दहा दिवसांपूर्वी सुवर्णा हिच्या माहेरी जावून तिची आई लक्ष्मी शहाजी साळवे (वय ५५, रा. कवडीपाट, ता. हवेली, मुळ रा. कव्हररोपाळे, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांची भेट घेतली व सुवर्णाला नंदावतो असे सांगत सुवर्णाचा पत्ता मिळविला. मागील दिवसांपासून ते दोघे एकत्र राहत होते, मात्र त्यांच्यातील वाद थांबले नव्हते.

बुधवारी पहाटे किसन याने सुवर्णाच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून तिचा खून केला. तसेच स्वत: सुवर्णाच्या घरापासून जवळच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुवर्णाच्या घराकडे पाहिले असता शेजाऱ्यांना सुवर्णाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तर तासाभरामध्ये किसनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व शिवाजी ननावरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pune news husband kills wife in Loni Kalbhor