'डेंगी' आढळल्यास खटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे - खासगी मिळकतींमध्ये होणारी डासांची पैदास रोखणे ही महापालिकेपुढची सर्वांत मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढत असून, डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डासांच्या उत्पत्तीला जबाबदार ठरलेल्या मिळकतदारांविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

पुणे - खासगी मिळकतींमध्ये होणारी डासांची पैदास रोखणे ही महापालिकेपुढची सर्वांत मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढत असून, डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डासांच्या उत्पत्तीला जबाबदार ठरलेल्या मिळकतदारांविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सरकारी संस्था अशा सर्व ठिकाणच्या डासांचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यात 65 टक्के डास हे सोसायट्यांमधून आढळल्याची माहिती पुढे आली आहे. सोसायट्यांमधील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात डास आढळल्याचे निरीक्षणही कीटकतज्ज्ञांनी नोंदविले आहे. घरातील फ्रिज, फुलदाणी, वातानुकूलित यंत्रणा, कुंड्यांमध्ये साचलेले पाणी येथे डेंगीच्या डासांच्या आळ्या आढळल्या आहेत. तसेच सोसायटीच्या परिसरात पडलेले टायर, करवंट्या यात पाणी साचून तेथे डासोत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकाबाजूने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आणि दुसरीकडे धूर फवारणी सुरू असली तरीही सतत पडणाऱ्या पावसाच्या सरी यातून डासांची पैदास रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या मिळकतीच्या परिसरात डास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सुमारे सहा हजार नोटीस मिळकतदारांना बजाविण्यात आल्या आहेत. त्यातून प्रशासकीय शुल्कदेखील वसूल करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर आता डासांची पैदास आढळणाऱ्या मिळतदारांविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

डेंगीच्या रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी डासोत्पत्तीची ठिकाणांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यामुळे डास आढळणाऱ्या मिळकतदारांविरुद्ध खटला भरण्याचा निर्णय घेतला आहे. खटले भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसांमध्ये ती पूर्ण होईल.
- डॉ. कल्पना बळीवंत, कीटकरोग विभागप्रमुख

Web Title: pune news If the 'dengue' is found then crime