नऱ्हेतील अनधिकृत तीनमजली इमारतीवर PMRDAची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

बेकायदेशीर, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई

पुणे : बेकायदेशीर, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी नऱ्हे येथे तीनमजली निवासी इमारतीवर गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात 'पीएमआरडीए'च्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

नऱ्हे येथील सर्व्हे क्रमांक 5/1/1 येथील विशाल राजेंद्र भूमकर, राजेंद्र म्हस्कु भूमकर यांना अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम,1966 कलम 53, 54 अंतर्गत नोटीस दिली होती.
सुमारे 2 हजार 200 चौरस फुटांचे पार्किंगसह तीनमजल्यांचे बांधकाम सुरू होते. या नोटिशीकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरू ठेवल्याने आज (गुरुवारी) सकाळी पोलिस बंदोबस्तात तीनमजली इमारत पाडून जमिनदोस्त करण्यात आली. 

पीएमआरडीए अध्यक्ष किरण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार विकास भालेराव, उपअभियंता वसंत नाईक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, पोलिस निरीक्षक बबन खोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती गडकरी आणि अन्य कर्मचारी यांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: pune news illegal building in narhe demolished