पुणेकरांचा दस्तऐवज राहणार सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे - सर्वसामान्य नागरिक महापालिकेकडे महत्त्वाची कागदपत्रे विश्वासाने सुपूर्द करतात; परंतु ती शोधण्याची वेळ आल्यास मिळतीलच याची शाश्‍वती नसते, असे निरीक्षण एका स्वयंसेवी संस्थांच्या पाहणीत नोंदविण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी दिलेली कागदपत्रे, पालिकेतील जनरल रेकॉर्ड, आयुक्‍त कार्यालयातील नोंदी, अधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासकीय अहवाल असा महत्त्वपूर्ण दस्तऐवज जतन करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेने या रेकॉर्डचे डिजिटायझेशनही करावे, अशी मागणी शहरातील काही सामाजिक संस्थांनी केली आहे.

महापालिकेच्या विविध खात्यांमधील कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. नायडू रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये हा दस्तऐवज जतन करण्यात येणार आहे.

याठिकाणी पावणेतीन कोटी रुपये खर्च करून ‘व्हर्टिकल स्टोअरेज सिस्टिम’ बसविण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेतील फाइलसोबतच नागरिकांची कागदपत्रे सुरक्षित राहतील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
नायडू रुग्णालयाच्या पाठीमागील प्रशासकीय इमारतीमध्ये १९ हॉल आहेत.

त्यामध्ये विविध खात्यांमधील रेकॉर्ड जतन करून ठेवण्यात येईल. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात अद्ययावत ‘व्हर्टिकल स्टोरेज सिस्टिम’ बसविण्यासाठी दोन कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने हे काम मुंबईच्या एका खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे.  

रेकॉर्ड जतन करण्यासाठी ‘व्हर्टिकल स्टोअरेज सिस्टिम’ बसविणे ही खर्चिक बाब आहे. काही सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. त्या धर्तीवर महापालिकेने कागदपत्रे डिजिटायझेशन करून जतन करावीत. 
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

नागरिकांनी बांधकाम परवाना किंवा इतर कामांसाठी दिलेली कागदपत्रे, मिळकतकर भरणा यासह महत्त्वाची कागदपत्रे पालिकेत असतात. ही कागदपत्रे हवी असल्यास लवकर मिळत नाहीत, त्यामुळे पालिकेने कागदपत्रांचे डिजिटायझेशन करावे. 
- प्रसाद गायकवाड, नागरिक, वारजे 

सहा प्रकारांमध्ये नोंद
‘अ’ प्रकारची कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करावी लागतात. ‘ब’ प्रकारची कागदपत्रे ३० वर्षे, ‘ब-’ प्रकारातील कागदपत्रे १० वर्षे, ‘क’ प्रकारातील कागदपत्रांच्या नोंदी पाच वर्षांपर्यंत, ‘क-१’ या प्रकारातील कागदपत्रे तीन वर्षे, तर ‘ड’ प्रकारातील कागदपत्रे एक वर्ष जतन करून ठेवणे बंधनकारक आहे.

 नायडू रुग्णालयामागे तीन मजली इमारतीचा उपयोग
 महत्त्वपूर्ण दस्तऐवज जतन करणार  
 व्हर्टिकल स्टोअरेज सिस्टिम बसविणार 
 या सिस्टिमसाठी पावणेतीन कोटींची तरतूद

Web Title: pune news important doeument secure