रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये अखेर सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

'कॅग'ने ताशेरे ओढल्यानंतर प्रत्येक स्थानकावर होतेय पदार्थांची तपासणी

'कॅग'ने ताशेरे ओढल्यानंतर प्रत्येक स्थानकावर होतेय पदार्थांची तपासणी
पुणे - 'कॅग'ने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची (जेवण, नाश्‍ता, पाणी शीतपेये) तपासणी करण्यास रेल्वे बोर्डाने सुरवात केली आहे. त्यामुळे ज्या गाड्यांमध्ये ही सुविधा आहे, त्यामधील खाद्यपदार्थांचे नमुने जवळपास प्रत्येक रेल्वे स्थानकावर घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांत काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे सध्या दिसू लागले आहे.

देशात रेल्वेच्या 12 हजार 500 गाड्या धावतात. तर साडेतीन कोटीहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यापैकी काही गाड्यांना पॅन्ट्रीकारची व्यवस्था आहे. काही गाड्यांमध्ये इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्यामार्फत तर काही गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून खाद्यपदार्थ पुरविले जातात. या शिवाय, रेल्वे स्थानकावर असलेले फूड मॉल आणि स्टॉलही चालविले जातात. त्यातून होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून रेल्वे बोर्डाकडे तक्रारी येत होत्या. त्याची दखल बोर्डाने घेतली तरी आयआरसीटीसी आणि रेल्वे प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून त्यातून पळवाट काढीत असे. त्यामुळे त्यात सुधारणा होत नव्हती. मात्र कॅगने मध्यंतरी रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांतील पॅन्ट्रीकारमधून पुरविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी केली. त्या वेळी प्रवाशांनी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल कॅगने सादर करीत रेल्वे बोर्डावर ताशेरे ओढले.

त्यामुळे रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसी आणि रेल्वे प्रशासनाला रेल्वेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. परिणामी, सध्या रेल्वेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांची तपासणी आणि नमुने घेण्याचे काम प्रत्येक स्थानकावर केले जात आहे.

रेल्वे गाड्यांमधील जेवण ऐच्छिक?
रेल्वे बोर्डाच्या "गोल्डन ट्रेन' म्हणून दुरांतो, राजधानी आणि शताब्दी या गाड्या ओळखल्या जातात. त्यांचे बुकिंग चार महिने आधीच होते. या गाड्यांचे तिकीट बुकिंग करतानाच जेवणाचे पैसे घेतले जातात. त्यामुळे इच्छा असो नसो, तुम्हाला ते पैसे मोजावेच लागतात. कॅगच्या अहवालानंतर या गाड्यांमधील जेवण ऐच्छिक करावे का, असा विचार रेल्वे बोर्डाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रेल्वे गाड्यांमधील खाद्यपदार्थांबाबत नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविणाऱ्या रेल्वे बोर्डाचे कॅगने कान उपटले हे चांगले झाले. परंतु कॅंगने ही पाहणी करताना रेल्वे गाड्यांमध्ये, तसेच स्टेशनवर विक्री करणारे फेरीवाले त्यांच्या नजरेतून कसे सुटले, त्यांच्याही खाद्यपदार्थांची तपासणी करणे आवश्‍यक होते. त्याची दखल रेल्वे बोर्डाने घ्यावी.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: pune news Improved improvement in the food items of the train