आणखी दीड लाख घरांना मिळकतकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांमधील १ लाख ४२ हजार घरांना महापालिकेचा मिळकतकर लागू होणार असून, त्याचे सूत्र निश्‍चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या करापेक्षा २० टक्के अधिक रक्कम मिळकतकर म्हणून नागरिकांना भरावी लागणार आहे. ग्रामपंचायतींकडे नोंद नसलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण महापालिका १ एप्रिलपासून करणार आहे. 

पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांमधील १ लाख ४२ हजार घरांना महापालिकेचा मिळकतकर लागू होणार असून, त्याचे सूत्र निश्‍चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या करापेक्षा २० टक्के अधिक रक्कम मिळकतकर म्हणून नागरिकांना भरावी लागणार आहे. ग्रामपंचायतींकडे नोंद नसलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण महापालिका १ एप्रिलपासून करणार आहे. 

राज्य सरकारने ४ ऑक्‍टोबर रोजी महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या ११ गावांची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार लोहगाव (उर्वरित), मुंढवा, साडेसतरानळी, शिवणे, उत्तमनगर, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी, उरळी देवाची आदी गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. या गावांमधील मिळकतींची नोंद ग्रामपंचायतींकडे आहे. गावांचा महापालिकेत समावेश झाल्यामुळे प्रशासनाने ग्रामपंचायतींचे दफ्तर ताब्यात घेतले आहे. त्यातील नोंदींच्या आधारे ११ गावांच्या हद्दीत १ लाख १५ हजार मिळकती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मिळकतींना महापालिकेचा मिळकतकर थेट लागू झाल्यास नागरिकांवर आर्थिक बोजा पडू शकतो. हे लक्षात घेऊन प्रशासनाने ग्रामपंचायत आकारत असलेल्या कराच्या २० टक्के अधिक रक्कम मिळकतकर म्हणून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील चार वर्षे प्रत्येकी २० टक्‍क्‍यांनी त्यात वाढ होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. निवासी वापराच्या आणि व्यावसायिक वापराच्या मिळकतींना लागू होणाऱ्या मिळकत कराचे सूत्र निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींच्या नोंदीमधील मिळकतींना मिळकत कर लागू करण्यासाठीच्या प्रक्रियेवर प्रशासनाने सध्या लक्ष केंद्रित केले आहे.  समावेश झालेल्या गावांमधील सर्वच मिळकतींची नोंद ग्रामपंचायतीकडे झालेली नाही, असे प्रशासनाला आढळून आलेले आहे. त्यामुळे त्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी एक एप्रिलपासून महापालिका सर्वेक्षण सुरू करणार आहे. त्या मिळकतींना बाजारमूल्यानुसार मिळकतकर लागू होणार असून, त्यानुसार नागरिकांकडून तो वसूल करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ग्रामपंचायतींमध्ये नोंद नसलेल्या मिळकतींची संख्या सुमारे एक ते सव्वा लाख असू शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

१० लाख मिळकतींचा टप्पा ओलांडणार 
महापालिका क्षेत्रात सध्या निवासी आणि व्यावसायिक वापराच्या अशा ८ लाख ४० हजार मिळकती आहेत. ११ गावांमधील १ लाख ४२ हजार मिळकतींची त्यात भर पडली आहे. त्यामुळे एकूण मिळकती ९ लाख ५५ हजार झाल्या आहेत. गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर मिळकतींच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे महापालिका दहा लाख मिळकतींचा टप्पा या वर्षात ओलांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करआकारणी लवकरच 
समाविष्ट ११ गावांमध्ये एक लाख ४२ हजार मिळकती आहेत. ग्रामपंचायतींची त्यांच्याकडे सुमारे ११० कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता ही थकबाकी महापालिकेला वसूल करावी लागणार आहे. तसेच या ११ गावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा आदी विकासकामांसाठी वर्गीकरणाद्वारे ३३ कोटी रुपये लगेचच उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. ११ गावांतील कर आकारणी लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news Income Taxes PMC