शैक्षणिक संस्था अन्‌ करिअरच्या पर्यायांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

"सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017'ला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी

"सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017'ला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी
पुणे - इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍनिमेशन आणि आयटी अशा विविध क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017' मार्गदर्शक ठरले. रविवारी (ता. 28) या प्रदर्शनाचा समारोप झाला. एकाच छताखाली विविध नामवंत शैक्षणिक संस्थांसह करिअरच्या विविध पर्यायांची सखोल माहिती विद्यार्थी आणि पालकांना घेता आली. सुटीचा दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयीची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनात करिअर तज्ज्ञांच्या व्याख्यानालाही विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

"सकाळ माध्यम समूहा'ने आयोजिलेल्या या प्रदर्शनात कला शाखेपासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रवेश परीक्षा, महाविद्यालयाची निवड, अभ्यासक्रम, कॅम्पस आणि करिअर कसे निवडावे, अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थ्यांना मिळाली. केंद्रीय-राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इंजिनिअरिंग, मेडिकल आणि बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या विविध प्रवेश परीक्षांची माहितीही विद्यार्थ्यांना घेता आली.
कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, आर्किटेक्‍चर, माहिती तंत्रज्ञान; तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल आणि विशिष्ट विषयातील पदविकांबद्दलच्या प्रवेशप्रक्रियेची माहितीही विद्यार्थी आणि पालकांना मिळाली. नामवंत शैक्षणिक संस्थांनी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. "युनिक ऍकॅडमी' हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होते. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एकत्वम्‌ ऍकॅडमी, ऍस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग ऍकॅडमी, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन हे सहप्रायोजक होते.

करिअर तज्ज्ञांच्या व्याख्यानाला प्रतिसाद
"युनिक ऍकॅडमी'चे संचालक तुकाराम जाधव यांचे "यूपीएससी नागरी सेवा परीक्षांची तयारी' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. त्यानंतर "कॉमर्समधील प्रोफेशनल कोर्सेस' या विषयावर अभिषेक झावरे, सुबोध शहा आणि सुचरित राजाध्यक्ष यांची व्याख्याने झाली. संतोष रासकर यांचे "क्रिएटिव्ह क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि करिअर'; तर प्रा. विजय नवले यांचे "अभियांत्रिकी करिअर व प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन' यावर व्याख्याने झाली.

Web Title: pune news Information about educational institutions and career options