एकमेकांना जोडणारी सांस्कृतिक चळवळ हवी! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कधी लेखनातून, तर कधी व्याख्यानातून काश्‍मीर प्रश्‍न तळमळीने मांडणारे... हा प्रश्‍न सोडवता येऊ शकतो, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांतून सतत धडपड करणारे एक नाव म्हणजे संजय नहार. "सरहद' संस्थेच्या माध्यमातून त्यांनी "काश्‍मीर महोत्सव' सध्या पुण्यात आयोजित केला आहे. हा महोत्सव केवळ "सांस्कृतिक महोत्सव' नसून, तो एकमेकांना जवळ आणणारा एक उत्सवही आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद. 

"सरहद'च्या माध्यमातून होणारे उपक्रम हे एकमेकांना जोडणारे असतात. तसाच उद्देश "काश्‍मीर महोत्सवा'मागे आहे? 
अर्थातच...! साहित्य, संगीत, नाटक, नृत्य अशा कलांच्या माध्यमातून एकमेकांतील नाते दृढ करता येऊ शकते, यावर आमचा विश्‍वास आहे. त्यामुळे 1997 मध्ये या महोत्सवाची सुरवात केली. पहिल्याच महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुणेकरांनी भरभरून कौतुकही केले. त्यामुळे अशा प्रकारचा महोत्सव दरवर्षी घ्यायचा, असा निर्णय आम्ही घेतला. भजन सोपोरी, अभय सोपोरी, प्राण किशोर कौल असे अनेक नामवंत गायक-वादक, लेखक यानिमित्ताने पुण्यात आले आणि तिथली संस्कृती आपल्याला समजून घेता आली. 

काश्‍मीर आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी काय करता येईल? 
काश्‍मीर आणि महाराष्ट्र यांच्यात आपण नव्याने नाते निर्माण करत आहोत, असे नाही. हे नाते हजारो वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी जगभरातील लोक शिक्षणासाठी काश्‍मीरला जायचे. आता परिस्थिती बदलली आहे; पण नाते कायम आहे. ते वाढविण्यासाठी सांस्कृतिक चळवळ उभारली गेली पाहिजे. "सरहद'कडून तसा प्रयत्न सुरूही आहे. तिकडच्या लेखक-कलावंतांना इकडे आणणे आणि इकडच्यांना तिकडे नेणे, इथल्याप्रमाणेच तिथेही सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे, अशा माध्यमातून एकमेकांमध्ये संवाद घडवून आणला जातो. याकडे आम्ही "एकमेकांना जोडणे', या नजरेतूनच पाहतो. 

काश्‍मीर म्हटले की निसर्गसौंदर्य नजरेसमोर येते. तसे दहशत, भीती हे चित्रही येते. 
काश्‍मीर इतके सुंदर आहे की, प्रत्येकालाच तो आपल्यासोबत राहावा, असे वाटते. इथला निसर्ग, इथले वातावरण प्रत्येकाला मोहित करते; पण या भागातील नागरिकांना "भारत हा आपलाच देश आहे' असे वाटणे, तसे वातावरण निर्माण करणे आणि ते वाढविणे ही आपली जबाबदारी आहे. असे झाले तर तिथले नकारात्मक चित्र बदलायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाला शांतता हवी आहे. प्रेम हवे आहे. दहशत, भीती कोणाला हवी असते का? आत्तापर्यंत नेहमीच महाराष्ट्राची एकमेकांना जोडणारी भूमिका राहिलेली आहे. तसा आपला इतिहास आहे. काश्‍मीरच्या बाबतीतही आपली तीच भूमिका आहे. 

पंजाबमधील घुमानमध्ये "सरहद'च्या प्रयत्नांमुळे रस्ते बांधले गेले. रेल्वे सुविधा सुरू झाली. तशा प्रकारचे प्रयत्न काश्‍मीर भागातही सुरू आहेत का? 
हो. कारगिल हे राष्ट्रभक्ती, शौर्याचे प्रतीक आहे. म्हणून कारगिल हे पर्यटन स्थळ व्हायला हवे, असे वाटते. या दृष्टिकोनातून आम्ही पावलेही टाकली आहेत; पण ती लोकचळवळ व्हायला हवी. कारगिलला जाण्यासाठी दिल्ली किंवा जम्मूवरून थेट विमानसेवा असावी. यासाठी आम्ही 50 खासदारांची स्वाक्षरी असलेले पत्र सरकारला दिले आहे. कारगिलमध्ये मुक्कामाच्या चांगल्या सुविधा असाव्यात. तिथला इतिहास सांगणारी, शौर्यगाथा सांगणारी वेगवेगळी संग्रहालयेही असावीत. अशा वेगवेगळ्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोचवणार आहोत.

Web Title: pune news interview sanjay nahar