पारंपरिक शिक्षणाला ‘अच्छे दिन’

शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे- एमएस्सीचे शिक्षण घेणाऱ्या अमित बडदे हा महाविद्यालयातील कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झाला. त्याचे संगणक कौशल्य, स्वभाव आणि काम करण्यासाठीची चुणूक पाहून प्रभावित झालेल्या कंपनीने साडेचार लाखांचे पॅकेज देऊन त्याला करारबद्ध केले. एरवी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात येणारा हा अनुभव पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ लागल्याने आता पारंपरिक शिक्षणालाही ‘अच्छे दिन’ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

पुणे- एमएस्सीचे शिक्षण घेणाऱ्या अमित बडदे हा महाविद्यालयातील कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झाला. त्याचे संगणक कौशल्य, स्वभाव आणि काम करण्यासाठीची चुणूक पाहून प्रभावित झालेल्या कंपनीने साडेचार लाखांचे पॅकेज देऊन त्याला करारबद्ध केले. एरवी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात येणारा हा अनुभव पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ लागल्याने आता पारंपरिक शिक्षणालाही ‘अच्छे दिन’ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

पदवी शिक्षण घेतानाच नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड करणाऱ्या कंपन्या आता अभियांत्रिकी वा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांवर अवलंबून राहिलेल्या नाहीत. त्यांनी आपला मोर्चा पारंपरिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांकडे वळविला आहे. तेथील विद्यार्थ्यांनादेखील वार्षिक पाच ते सहा लाख रुपयांचे पॅकेज माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून मिळू लागले आहे.

शहरातील महाविद्यालयांमध्ये बीएस्सी संगणकशास्त्र वा बीसीए, एमएस्सी हे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या नोकरीच्या संधी मिळत आहेत.स.प. महाविद्यालयाच्या प्राध्यापक मधुवंती तेजे यांनी सांगितले, की पारंपरिक पदवी देणाऱ्या महाविद्यालयातही कॅंपस निवडीसाठी येणाऱ्या कंपन्यांची संख्या आता वाढू लागली आहे. इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांचा यात समावेश आहे. दहावीपासून पदवीपर्यंत अभ्यासात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कंपन्या नोकरीची संधी देतात. संगणकशास्त्र विषय घेऊन बीएस्सी करणाऱ्यांना अडीच ते तीन लाख रुपयांचे पॅकेज दिले जाते. चांगल्या कंपन्या यापेक्षाही अधिक पगार देतात.

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पगाराची अपेक्षा आणि पदवीच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा यात मोठी तफावत आहे. पदवीचे विद्यार्थीची तुलनेने कमी पगारात काम करण्यासाठीही तयारी असल्याने या कंपन्या कदाचित पारंपरिक महाविद्यालयांकडे येत असाव्यात. यामुळे विद्यार्थ्यांनादेखील शिक्षण घेताना नोकरी पक्की होण्याची हमी मिळू लागली आहे. हा बदलता ट्रेंड खूप सकारात्मक आहे, असे मत तेजे यांनी व्यक्त केले.

मूल्यांनाही महत्त्व
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या प्रमुख मनीषा सूर्यवंशी यांनीही, अनेक कंपन्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. ‘‘आमच्या महाविद्यालयातील एमएस्सी आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांना पाच आणि सहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही ही संधी मिळते. कंपन्या मुलाखत घेताना विद्यार्थ्याचा स्वभाव, त्याचा नम्रपणा, त्याच्यामध्ये रुजलेली मूल्ये यालाही महत्त्व देऊ लागल्या आहेत.’’

बीएस्सीच्या अभ्यासक्रमात सॉफ्टवेअरवर अधिक भर आहे. त्यामुळे कंपन्यांकडून त्यांना संधी दिली जात असेल. महाविद्यालयातील साधारण दहा विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. पाच लाखांपर्यंतचे वार्षिक वेतन त्यांना मिळाले आहे. अन्य विद्यार्थ्यांना दरमहा २० ते २५ हजार रुपये वेतन असलेल्या नोकरीच्या संधी कंपन्या देत आहेत. कमी वेतनात चांगले मनुष्यबळ मिळत असल्याने कंपन्या पारंपरिक महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत.
- पराग ताम्हनकर, प्लेसमेंट सेल प्रमुख, गरवारे महाविद्यालय 

मी पहिल्यांदाच मुलाखतीला गेले होते. कोणते प्रश्‍न विचारात, याचा अनुभव यावा म्हणून सहभागी झाले. या चाचणीत माझे विज्ञानाचे मूलभूत ज्ञान आणि संवादाचे कौशल्य महत्त्वाचे ठरले आणि मला ‘एल अँड टी इन्फोटेक’ या कंपनीने नोकरीसाठी निवडले.
- नम्रता गुरिया, विद्यार्थिनी, टी. वाय. बीस्सी, सर परशुमराभाऊ महाविद्यालय

Web Title: pune news IT education campus interview