गुळाच्या भावात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची वाढ

संतोष शेंडकर
रविवार, 30 जुलै 2017

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यातच गुळाचा नवा हंगाम सुरू झाला आहे.

सोमेश्वरनगर : सुरू असलेला श्रावण आणि येऊ घातलेला गणपती या पार्श्वभूमीवर मागील पंधरवड्याच्या तुलनेत पाव किलो ढेपेच्या गुळाच्या भावात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. आज नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात पाव किलो ढेपेच्या गुळाला सरासरी ४५५० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. एक व अर्धा किलो ढेपेच्या गुळाला मात्र सरासरी शंभर-दीडशे रूपयांची वाढ झाली. 
 
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यातच गुळाचा नवा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला प्रतवारीनुसार गुळाला ३५०० ते ४००० रूपये प्रतिक्विंटल असा भाव होता. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही तसाच भाव कायम राहिला. परंतु मागील दहा-पंधरा दिवसात अर्धा व एक किलो गुळाच्या भावात प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रूपयांची वाढ झाली. परंतु पाव किलो गुळाच्या भावात पाचशे रूपयांची वाढ झाली. आज नीरा बाजार समितीत झालेल्या लिलावासाठी अकराशे बॅाक्स गुळाची आवक झाली होती. एक किलोसाठी ३६०० ते ३९०० रूपये, अर्धा किलोसाठी ३९०० ते ४१०० रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. पाव किलोला ४५०० ते ४६२५ रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. बहुतांश गूळ ४५५० या भावाने विकला गेला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाऊसच नसल्याने आवक वाढत चालली असून बाजार समितीत आठवड्यातून दोनदा होणाऱ्या लिलावाला हजार ते बाराशे बॅाक्स गुळाची आवक होत आहे. दौंड तालुक्यातून आवक होत होती आता पुरंदरमधून हिरालाल गायकवाड तर फलटणमधून भरत पवार यांचा गूळ येऊ लागला आहे. उसाची एफआरपी वाढल्याने गुळाकडे कल कमी राहिल असे वाटत असतानाच समाधानकारक भाव मिळू लागल्याने लवकरच आणखी गुऱ्हाळे सुरू होतील अशी शक्यता आहे.
 
याबाबत गूळ निर्यातदार समीर शहा म्हणाले, श्रावण महिना सुरू आहेच. शिवाय आगामी काळात पर्युषण पर्व, गणपती, नवरात्र असे सण येणार आहेत. त्यामुळे पाव किलोमध्ये पाचशे रूपयांनी भाव वाढले आहेत. चालू हंगाम शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळवून देईल. मागील हंगामात नोटाबंदीने बसलेल्या फटक्यातून यावर्षी सावरता येईल. थोडाफार फरक वगळता आताचे भाव स्थीर राहतील अशी अपेक्षा आहे. गुळाच्या खरेदी-विक्रीतील सेवा खर्चावर जीएसटी लागू झाल्याने खरेदी काहीशी मंदावली आहे. अन्यथा खरेदीसाठी आणखी झुंबड उडाली असती.
नीरा बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर व उपसभापती शंकर बाठे म्हणाले, आषाढ महिन्यात शेतकऱ्यांनी चिक्की गूळ बनविला. आता येणाऱ्या सणासुदीला पावशेर ढेपेच्या गुळाला मागणी असते हे ओळखून शेतकरी पाव किलो गूळ बनवत आहेत. गणपतीच्या पार्श्वभूमीवर गुळाचे मोदक बनविण्याची शेतकऱ्यांची तयारी चालली आहे. नीरा आणि सांगली बाजार समिती बारा महिने गूळ पुरवणारी आहे. सप्टेंबरमध्ये बाजारातून गुळाची निर्यात सुरू होईल

Web Title: pune news jaggery prices up agriculture market