साताऱ्याच्या सराफाला अडीच कोटींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे  - जनता सहकारी बॅंकेत तारण ठेवलेल्या तीन कोटी रुपयांचे सोन्याचे आमिष दाखवून साताऱ्याच्या सराफा व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकेत तारण ठेवलेले ते सोने बनावट निघाले असून, या गुन्ह्यात बॅंकेच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच जण फरारी आहेत. 

पुणे  - जनता सहकारी बॅंकेत तारण ठेवलेल्या तीन कोटी रुपयांचे सोन्याचे आमिष दाखवून साताऱ्याच्या सराफा व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकेत तारण ठेवलेले ते सोने बनावट निघाले असून, या गुन्ह्यात बॅंकेच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच जण फरारी आहेत. 

अमर विठ्ठल भोसले (वय 35, रा. साई विहार, उंड्री), समीर गुलाब इनामदार (वय 32) व वासंती पोपटराव जाधव (वय 37, दोघे रा. कोळकी, ता. फलटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. धीरज उत्तम जाधव, गजानन भगवान बर्गे (वय 38), संजय भगवान बर्गे (वय 42, दोघेही रा. सातारा), नरेंद्र नारायण अत्रे (वय 53, रा. स्वरूप कॉलनी, सिंहगड रस्ता) व सुधीर राजेश्‍वर भालेराव (वय 49, रा. शांतिनिकेतन सोसायटी, वारजे) अशी अन्य संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सराफा व्यावसायिक वैभव धमणकर (वय 36, रा. खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धमणकर यांचे वाई येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. जुलै महिन्यात वासंती जाधव ही महिला वाई येथे सोने खरेदीसाठी गेली होती. त्या वेळी तिने धमणकर यांना समीर इनामदार हा डेव्हलपर माझ्या ओळखीचा आहे. त्याचा मित्र अमर भोसले याला पैशांची गरज आहे. त्याच्याकडे भरपूर सोने आहे; परंतु ते पुण्यातील जनता सहकारी बॅंकेत तारण असल्याचे सांगितले. तिने इनामदार, भोसले आणि धमणकर यांची ओळख करून दिली. 

भोसले याने बॅंकेच्या भवानी पेठेतील शाखेत 13 किलो 600 ग्रॅम सोने तारण ठेवले आहे. त्यापोटी दोन कोटी 55 लाख रुपये कर्ज घेतले होते. या सोन्याची बाजारात तीन कोटी रुपये किंमत आहे. कर्जाची रक्‍कम एकरकमी भरल्यास डिस्काउंट मिळणार असून, तुम्ही ते सोडवून घ्या, असे सांगितले. त्यानंतर संशयिताने फिर्यादीची जनता सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापकांची ओळख करून दिली. त्यानंतर फिर्यादीने गहाणवट सोने सोडवण्यासाठी आरटीजीएसद्वारे दोन कोटी 55 लाख रुपये भरले. बॅंकेतून ते सोने घेऊन गेल्यानंतर तपासून बघितले असता ते बनावट निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धमणकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी तपास करत आहेत.

Web Title: pune news Jeweller crime