कष्टकरी महिलांची कंपन्या करतात पिळवणूक- संदीप मोझर

रमेश मोरे
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जुनी सांगवी, नवी सांगवी, औंध कँप, पिंपळेगुरव व परिसरातील मायक्रो फायनान्स या खासगी कंपन्याकडुन कर्ज घेतलेल्या महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी संपुर्ण कर्जमुक्ती महिला  मेळावा सांगवी येथील सुमनश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

जुनी सांगवी : महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता बचत गटाची आर्थिक चळवळ मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मोडीत काढली काढली आहे. महाराष्ट्रा बाहेरच्या या कंपन्यांनी गेली दहा वर्षापासुन कष्टकरी सर्वसामान्य महिलांना कर्जे वाटप करून वसुलीपोटी वेठीस धरले आहे. राष्ट्रीयीकृत बँका गरजुंना कर्ज देत नाहीत. तर महाराष्ट्रात हजारो कोटी रूपये महाराष्ट्रात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांच्या घरी जाऊन वाटले आहेत. याचा तपास व्हायला हवा,  असे सांगवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित संपूर्ण कर्जमुक्ती महिला मेळाव्यास मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

मोझर पुढे बोलताना म्हणाले, गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची आर्थिक चळवळ या खाजगी कंपन्यांमुळे मोडकळीस आली आहे. कष्टकरी सर्वसामान्य महिलांना एकत्रित करून या कंपन्यांकडुन घरपोच कर्ज वाटली जातात. कर्ज परतफेड दर आठवड्याला करावी लागते. महिलांच्या या समुहाला कर्ज दिले जाते. मात्र घरातील पुरुषांना या ग्रुप बैठकीस थांबण्यास परवानगी नसते. समुहाद्वारे दिलेले कर्ज परतफेड करण्यासाठी ग्रुपमधील प्रत्येक महिलेला शेवटच्या कर्जदार महिलेता कर्ज हप्ता भरेपर्यंत थांबावे लागते.

मायक्रो फायनान्स हा कन्सेप्ट महाराष्ट्रात आणून त्यांना लायसन्स दिली आहेत. आज ही विषावळ कष्टक-यांची आर्थिक पिळवणूक करत मोठी होत आहेत. कर्ज परत फेडी साठी कंपन्यातील ही मंडळी कर्जदार महिलांना त्यांच्या कुटुंबांना धमकावतात, तुम्हाला दुसरे कुठलेच कर्ज मिळणार नाही, घरातील मुलांना सरकारी नोकरी साठी अडथळा येईल अशा भितीच्या धमक्या देऊन कर्जाची परतफेड करून घेतात. अशा मानसिक दबावामुळे अनेक कुटुंबे या कंपन्यांनी वेठीस धरली आहेत. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लवकरच मंत्रालयावर याबाबत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी मोझर यांनी सांगीतले. आमचा उद्रेक होतो ते अशा घटनांमुळेच असे ही त्यांनी बोलताना सांगीतले. यावेळी माजी नगरसेविका जयश्रीताई मारणे, मनसेचे पिं. चि. गटनेते सचिन चिखले, शहर सचिव राजू सावळे, रविदास काळे, स्नेहल बांगर, शाम जगताप, हेमंत डांगे, संजय यादव, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक राजु सावळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन विशाल मानकरी यांनी केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news juni sangvi micro finance cos deceive bachatgats