शिवजयंतीला जुन्नरला शिवनेरी महोत्सवाचे आयोजन

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अडीच कोटीची तरतुदः आमदार सोनावणे

जुन्नर (पुणे): राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवजयंतीला किल्ले शिवनेरी- जुन्नर येथे शिवनेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अडीच कोटीची तरतुदः आमदार सोनावणे

जुन्नर (पुणे): राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवजयंतीला किल्ले शिवनेरी- जुन्नर येथे शिवनेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

येत्या 19 फेब्रुवारीला शिवनेरीवरील शिवजयंती सोहळा व शिवनेरी महोत्सवाच्या नियोजनासाठी जुन्नर येथे शासकीय विश्रामगृहात आमदार शरद सोनवणे, प्रांतअधिकारी अजय देशमुख यांच्या उपस्थितीत अधिकारी व पदाधिकारी यांची बुधवारी (ता. 24) बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक, विविध लोक प्रतिनिधी तसेच शासकीय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार सोनावणे म्हणाले, शिवजयंती निमित्ताने 17, 18, 19 फेब्रुवारी रोजी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवजन्मोत्सव सोहळा, मनोरंजनाचे कार्यक्रम, शाहिरी जलसे, आयोजित करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक विभागाकडून शिवनेरी महोत्सवासाठी अडीच कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींना राज्य पातळीवरील सर्वोत्तम कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

शिवनेरी महोत्सवाच्या अंतिम नियोजनाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन 29 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. त्यावेळी संपूर्ण नियोजनाचा आराखडा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शिवनेरी महोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ तसेच मान्यवर मंत्रीमहोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राजश्री शाहु महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे आदींची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. मोठ्या प्रमाणात मंत्रीमंडळ तसेच मान्यवर शिवनेरी म्होत्सवासाठी हेलिकॉप्टरने येणार असल्याने जवऴपास सात हेलिपॅड बनवणे, राज्यभरातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वाहतूक व्यवस्थेचे नियोजन याबाबत विविध शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या.

शिवजयंतीच्या औचित्याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, शिवनेरी केसरी कुस्ती स्पर्धा तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन स्थानिकांचा या सोहळ्यात सहभाग वाढावा अशा पद्धतीने नियोजन करण्यात येऊन या महोत्सवाची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन स्थानिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याने आमदार सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: pune news junnar shiv jayanti shivneri mahotsav