कन्याशाळेला झळाळी द्यावी - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

पुणे - ‘‘एखाद्या शिक्षण संस्थेच्या लौकिकात आणि गुणवत्तेत भर टाकण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी पुढे येतात. त्याप्रमाणे श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेसाठीही आजी-माजी विद्यार्थिनी, शिक्षक आणि संबंधित मान्यवरांनी कृतज्ञता म्हणून शाळेला पुन्हा झळाळी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत,’’ असे भावनिक आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

पुणे - ‘‘एखाद्या शिक्षण संस्थेच्या लौकिकात आणि गुणवत्तेत भर टाकण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी पुढे येतात. त्याप्रमाणे श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेसाठीही आजी-माजी विद्यार्थिनी, शिक्षक आणि संबंधित मान्यवरांनी कृतज्ञता म्हणून शाळेला पुन्हा झळाळी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत,’’ असे भावनिक आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ संचालित श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दीवर्षाचा पूर्तता समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी बापट बोलत होते. या कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक, शताब्दी महोत्सव समिती अध्यक्ष आणि महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव डॉ. मीना कुटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य सुवर्णलता काळे, श्री. ना. दा. ठाकरसी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद जुमळे उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘महिलांनी अनेक क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. आणखी बऱ्याच क्षेत्रात महिलांच्या कर्तबगारीला संधी आहे. त्यासाठी महिलांनी प्रयत्न करायला हवेत.’’ स्त्री शिक्षणाच्या हेतूने सुरू झालेल्या या शाळेचा इतिहास, सद्यःस्थिती, पुढील आव्हानांचा उल्लेखही त्यांनी या वेळी केला.

टिळक म्हणाल्या, ‘‘महिलांना सुशिक्षित बनवायचे असेल, तर त्यांना आवडणाऱ्या विषयातील शिक्षणाने सुरवात करायला हवी, अशा दूरदृष्टीतून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. कर्वे यांच्या याच दृष्टिकोनातून आजच्या काळातही मुलींना आवश्‍यक शिक्षण मिळायला हवे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही शाळा आहे. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकातील मुली, महिलांना या संस्थेमुळे शिक्षणाची संधी मिळाली आहे.’’ कन्याशाळेवर आधारित ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन या प्रसंगी टिळक यांच्या हस्ते झाले. या वेळी शिक्षक, आजी-माजी विद्यार्थिनींचाही सत्कार या वेळी झाला. ‘संपूर्ण दक्षिण आशियात महिलांसाठीचे हे एकमेव विद्यापीठ असल्याचे गौरवोद्‌गार काढत डॉ. वंजारी यांनी विद्यापीठाचे महत्त्व सांगितले. ठाकरसी परिवारातील सुधीर ठाकरसी यांनी संस्थेच्या भाऊबीज निधीला १० लाख रुपये दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कर्णबधिरांसाठी हवे युनिट
‘प्रत्येक शाळेत कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र युनिट असावे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबरच दिव्यांग मुले विकसित होत जातील,’ असे सांगत शाळेच्या माजी विद्यार्थिनी हेमा साठे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आपण स्वतः कर्णबधिर असताना शाळेत योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आपल्यात कसा विकास होत गेला, हेही हेमा यांनी या वेळी सांगितले.

Web Title: pune news kanya school development