कात्रज-कोंढवा रस्त्यावर महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे/ कोंढवा - ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती हा किरकोळ जखमी झाला आहे. खडी मशिन चौकाजवळ बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरील दाम्पत्य हे सासवड येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, महापालिकेकडून कात्रज- कोंढवा बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, त्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे. 

पुणे/ कोंढवा - ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती हा किरकोळ जखमी झाला आहे. खडी मशिन चौकाजवळ बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरील दाम्पत्य हे सासवड येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, महापालिकेकडून कात्रज- कोंढवा बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, त्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे. 

रूपाली सुभाष अडागळे (वय 35, रा. बावधन) असे त्या महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. मंजूनाथ बसप्पा खंडोजी (रा. रटीकवाड, जि. धारवाड, कर्नाटक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. सुभाष अडागळे हे मूळ सासवडचे असून, ते नोकरीनिमित्त बावधन परिसरात राहतात. त्यांनी सासवड पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या कामानिमित्त ते बुधवारी सासवड पोलिस ठाण्यात गेले होते. तेथील काम संपवून सुभाष अडागळे आणि त्यांची पत्नी रूपाली हे दोघेजण सायंकाळी घरी परतत होते. ते मरळनगर येथील उताराने कात्रजच्या दिशेने जात होते, त्या वेळी फुरसुंगीकडून कात्रजकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मागील सीटवर बसलेल्या रूपाली ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती सुभाष हे दुसऱ्या बाजूला पडले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी गर्दी केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. 

रुंदीकरण रखडले, वर्षात 40 जणांचा मृत्यू 
कात्रज- कोंढवा रस्त्यावर वर्षभरातील अपघातांत 40 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहराच्या दक्षिण भागात कात्रज- कोंढवा मार्ग हा उपनगरीय भागासह मुंबई, सोलापूर तसेच पुणे- बंगळूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या भागाचा महापालिकेत समावेश होऊन 19 वर्षे झाली. पण, रुंदीकरण रखडले आहे. महापालिकेच्या जुन्या आणि नवीन विकास आराखड्यानुसार 280 फूट रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, सध्या 60 ते 70 फूट अरुंद आहे. रुंदीकरणासाठी आवश्‍यक असणाऱ्या जागा हस्तांतरणापैकी सुमारे 70 ते 80 टक्के हस्तांतरण झाले आहे. उर्वरित जागेचे हस्तांतरण रखडले आहे. गोकूळनगर चौकापासून शत्रुंजय मंदिर चौकापर्यंत या रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविले आहेत. शत्रुंजय मंदिरापासून खडी मशिन चौकापर्यंत दुभाजक नाहीत. त्यामुळे या भागात उताराने अवजड वाहने मोठ्या वेगाने वेडीवाकडी धावतात. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांमुळे कोंडीत भर पडते. रोजच्याच कोंडीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू झाले नाही, तर रस्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर बधे यांनी दिला आहे. 

खडी मशिन चौक धोकादायक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष 
खडी मशिन चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. याठिकाणी सतत अपघात होत आहेत. खडी मशिन चौकात येवलेवाडीकडून येताना तीव्र उतार आहे. या चौकातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या भागात नागरीकरण वाढले असून, चौकातच अनधिकृत रिक्षाथांबे आहेत. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: pune news Katraj Kondhwa Road accident