महिलेकडून पाच महिन्यांच्या मुलीचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - नातेवाईक महिलेने पाच महिन्यांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. विश्रांतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे गतीने फिरवत त्या आरोपी महिलेला सोलापूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली. या मुलीच्या वडिलांनी आरोपी महिलेशी लग्नास नकार दिल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्‍त दीपक साकोरे यांनी सांगितले. 

रत्ना मरोळ (वय 35, रा. मूळ आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीची आई अमृता आखाडे (वय 20, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली. रत्ना ही फिर्यादी अमृता यांची मावशी आहे. रत्नाचा अमृताच्या पतीसोबत वाद होता. त्यामुळे तिने शुक्रवारी पहाटे सर्व जण झोपेत असताना अमृताच्या मुलीचे अपहरण करून पलायन केले. रत्ना आणि तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अमृताने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

वरिष्ठ निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजित चौगुले, कर्मचारी दिनकर लोखंडे, सुनील खंडागळे, विनायक रामाणे, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, योगेश चांगण, ज्योती खरात आणि रुचिका जमदाडे यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशननुसार ती महिला लोणावळा आणि पुन्हा खडकी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ती आंध्र प्रदेश येथील तिच्या गावी जात असल्याचा अंदाज काढत विश्रांतवाडी पोलिसांनी सोलापूर रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना आरोपी महिला आणि लहान मुलीचे फोटो व्हॉट्‌सऍप केले. त्यावरून सोलापूर रेल्वे पोलिसांनी चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये शोध घेत मध्यरात्री रत्नाला ताब्यात घेत मुलीला वाचविले. अमृताचा पती आणि आरोपी रत्ना हे मोलमजुरी करतात. रत्नाला अमृताच्या पतीसोबत लग्न करायचे होते. मात्र, त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे रत्नाने मुलीचे अपहरण केले.

Web Title: pune news kidnapping girl