आयटी कंपन्यांत दिवसभर चिंतेचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणेः शहराच्या काही भागांमध्ये घडलेल्या तुरळक अनुचित प्रकारांमुळे दिवसभर घबराट आणि अफवा पसरल्याचे चित्र होते. विशेषतः उपनगरांमधील नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये दिवसभर चिंतेचे वातावरण होते.

पुणेः शहराच्या काही भागांमध्ये घडलेल्या तुरळक अनुचित प्रकारांमुळे दिवसभर घबराट आणि अफवा पसरल्याचे चित्र होते. विशेषतः उपनगरांमधील नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये दिवसभर चिंतेचे वातावरण होते.

नगर रस्त्यावर झालेल्या अनुचित प्रकारानंतर पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये काही अनुचित प्रकार घडले. त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाल्यामुळे मंगळवारी सकाळपासून शहरात अफवांचे पेव फुटले होते. कोणतीही खातरजमा न करता "फॉरवर्ड' होणाऱ्या या संदेशांमुळे गोंधळात अधिकच भर पडत होती. परिणामी, सकाळपासून दुपारपर्यंत उपनगरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी शहराच्या विविध भागांतून येतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सायंकाळी घरी जाण्यात अडचणी येतील या भीतीपोटी शहरातील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी "सकाळ' कार्यालयात अनेकांनी दूरध्वनी केले. पोलिस व प्रशासनाकडून पुरेशा प्रमाणात खुलासा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचा निर्णय घेतला. काहींनी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष खबरदारी घेत त्यांना घरी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. गणेशोत्सव किंवा नववर्ष स्वागताच्या वेळी ज्याप्रमाणे बल्क एसएमएस पाठवून पोलिस जनजागृती करतात, त्याप्रमाणे संपूर्ण शहरातील मोबाईलधारकांना संदेश पाठवून पोलिसांनी आश्‍वस्त करायला पाहिजे होते, अशी भावना काही आयटी प्रोफेशनल्सनी व्यक्त केली.

Web Title: pune news koregaon bhima issue and it companies employees