‘चालते व्हा’चा नारा देत जागविल्या क्रांती दिनाच्या आठवणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पुणे - ब्रिटिशांकडून होत असलेली हिंदुस्थानची लूट आणि अत्याचार पाहून महात्मा गांधी यांनी अखेरचे आंदोलन छेडायचा निर्णय घेतला...‘भारत छोडो’, ‘चले जाव’चे ते आंदोलन होय. ‘चालते व्हा’, ‘क्विट इंडिया’ हा नारा ऐकू येत होता. आता मात्र हे अखेरचे आंदोलन...त्याची पहिली ठिणगी पुण्यातच पडली. काँग्रेस भवनावर तिरंगा फडकावणाऱ्या नारायण दाभाडे यांना हौतात्म्य आले. तो दिवस होता नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा... 

महात्मा गांधी यांनी मुंबईच्या काँग्रेसच्या अधिवेशनातच आठ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. दाभाडे यांनी पुण्यात मोर्चा काढून काँग्रेस भवनावर तिरंगा फडकविण्याचा निश्‍चय केला होता. मात्र ब्रिटिशांच्या गोळीबारात ते हुतात्मा झाले. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाली. तो प्रसंग पुन्हा एकदा देशवासीयांच्या डोळ्यांसमोर उभा राहावा, यासाठी इतिहासप्रेमी मंडळाने काँग्रेस भवन येथेच या प्रसंगाचे नाट्यरूप सादरीकरण केले. आरसीएम गुजराथी, मॉडर्न हायस्कूल, नूमवि प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी या शाळांचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. 

‘हो जाओ तैयार साथीयो, हो जाओ तैयार...’ या स्फूर्तिदायक गाण्याने नाट्याची सुरवात झाली. या प्रसंगी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे उपस्थित होते. हुतात्मा दाभाडे यांची भूमिका बालकलाकार मुकुंद कोंडे याने केली.

बलकवडे म्हणाले, ‘‘पुण्याच्या या भूमीने स्वातंत्र्याचा हुंकार दिला. परकीयांच्या दास्यातून समाजाची सुटका करण्यासाठी दाभाडे यांनी बलिदान दिले.’’ 
शेटे म्हणाले, ‘‘काँग्रेस भवनला इंग्रजांचा गराडा पडल्याचे वृत्त कळताच दाभाडे यांनी मोर्चा काढला. त्या वेळी झालेल्या गोळीबारात ते हुतात्मा झाले.’’

Web Title: pune news kranti day celebration