शिक्षक आघाडीत बंडाळी; नामधारी उमेदवाराला विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

संदीप बेडसे यांना उमेदवारी 
संघटनेचे अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले, ""महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने साठ वर्षांपासून लोकशाही पद्धतीने मुलाखतीद्वारे उमेदवार निश्‍चित केले आहेत. त्यामध्ये उमेदवाराची गुणवत्ता जोखली जाते. यावर्षीदेखील तीच पद्धत अवलंबिली आहे. त्यातून साक्री येथील संदीप बेडसे यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. ज्या लोकांच्या मनासारखे घडत नाही, ते आरोप करीत असतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. बेडसे हे मंत्रालयात अधिकारी होते. त्या पदाचा राजीनामा देऊन ते आता प्राध्यापक झाले आहेत. त्यांची निवड ही गुणवत्तेच्या निकषावरच झालेली आहे.''

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीत (टीडीएफ) बंडाळी माजली आहे. निवडणुकीसाठी नामधारी शिक्षकाला उमेदवारी देण्याचा घाट पदाधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप करीत शिक्षक चळवळीत काम करणाऱ्या शिक्षकाला उमेदवारी दिली नाही, तर वेगळा उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेवर त्यांनी बहिष्कार टाकला. 

परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी निवडीची प्रक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीने सुरू केली आहे. सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्यालयात त्याच्या मुलाखती शनिवारी पुण्यात आयोजित केल्या होत्या. त्यासाठी नगर, नाशिक, धुळे, जळगाव आदी ठिकाणांहून दहा इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक आले होते. धुळे जिल्ह्यातील संदीप बेडसे यांची उमेदवारी निश्‍चित होत असल्याचा संशय आल्यानंतर या इच्छुकानी बंडाचे निशाण फडकविले. 

एम. एस. लगड आणि एम. आर. शिंदे हे संघटनेचे सदस्य पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ""संघटनेचे प्रभारी अध्यक्ष हे उमेदवार निवडीची कार्यवाही एकतर्फी करीत आहेत. शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केलेले, शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी आयुष्यभर झटणाऱ्यांचा विचार केला जात नाही. संघटनेमध्ये नव्या दाखल झालेल्या बेडसे या नामधारी शिक्षकाला उमेदवारी निश्‍चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आम्ही इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या अन्यायकारक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहोत.'' 
उमेदवाराची निवड ही शिक्षकांतून होणार असली, तरी मुलाखती होत असलेल्या कार्यालयाबाहेर बाउन्सर तैनात करण्यात आले होते. त्यावरही अन्य शिक्षकांनी आक्षेप घेतला. तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेबाबत निषेध सभा घेण्यात आली. मुलाखतीतून योग्य उमेदवार निवडला गेला नाही, तर वेगळा उमेदवार निवडणुकीत उतरविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला ""मुलाखतीच्या ठिकाणी बाउन्सर म्हणजे दडपशाही करण्याचा हा प्रकार असून, संघटनेचे सदस्य म्हणून त्याचा निषेध करीत आहोत,'' अशी भावना संघटनेचे पदाधिकारी चांगदेव कडू यांनी व्यक्त केली. 

संदीप बेडसे यांना उमेदवारी 
संघटनेचे अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले, ""महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने साठ वर्षांपासून लोकशाही पद्धतीने मुलाखतीद्वारे उमेदवार निश्‍चित केले आहेत. त्यामध्ये उमेदवाराची गुणवत्ता जोखली जाते. यावर्षीदेखील तीच पद्धत अवलंबिली आहे. त्यातून साक्री येथील संदीप बेडसे यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. ज्या लोकांच्या मनासारखे घडत नाही, ते आरोप करीत असतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. बेडसे हे मंत्रालयात अधिकारी होते. त्या पदाचा राजीनामा देऊन ते आता प्राध्यापक झाले आहेत. त्यांची निवड ही गुणवत्तेच्या निकषावरच झालेली आहे.''

Web Title: Pune news legislative assembly election