'लेक लाडकी' योजनेकडे पालकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - अल्प उत्पन्न गटातील लाडक्‍या लेकीचे संगोपन करण्यासाठी महापालिकेने मांडलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांकडे लेकींच्या पालकांनीच पाठ फिरविल्याचे दिसत आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याचेही वास्तव या निमित्ताने उघड झाले आहे.

पुणे - अल्प उत्पन्न गटातील लाडक्‍या लेकीचे संगोपन करण्यासाठी महापालिकेने मांडलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांकडे लेकींच्या पालकांनीच पाठ फिरविल्याचे दिसत आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याचेही वास्तव या निमित्ताने उघड झाले आहे.

मुलींचा जननदर वाढावा, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने "लेक लाडकी', "कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया योजना' या योजनांची अंमलबजावणी 2013-14 पासून सुरू केली आहे.

त्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना थेट आर्थिक लाभ दिला जात आहे. परंतु, योजनांची फारशी माहिती नसल्यामुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली असल्याचे महापालिकेच्या नोंदीवरून दिसत आहे. याबाबत महापालिकेच्या समाजविकास विभागाचे प्रमुख संजय रांजणे म्हणाले, 'प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित महापालिकेच्या समूह संघटिका आहेत. त्यांच्यामार्फत या योजनांचे अर्ज नागरिकांकडून भरून घेतले जातात. तसेच महापालिका या योजनांची जाहिरातही करते. त्यानुसार अर्ज करणाऱ्या नागरिकांना या योजनेचे लाभ दिले जातात.''

लेक लाडकी योजना
पात्रता - महापालिका हद्दीत संबंधितांचे 3 वर्षे वास्तव्य हवे, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असल्याचा पुरावा हवा, मुलीच्या जन्मानंतर एक वर्षात महापालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक.
स्वरूप - पालकांचे 10 हजार रुपये आणि महापालिकेचे 20 हजार रुपये, अशी एकत्रित 30 हजार रुपयांची ठेव राष्ट्रीयीकृत बॅंकेत 18 वर्षे मुदतीने ठेवली जाते. त्यानंतर पालकांना सुमारे दीड लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते.
लाभार्थी - 2014-15 - 355, 2015-16 - 78, 2016-17 - 114

कुटुुंब कल्याण शस्त्रक्रिया
पात्रता - महापालिका हद्दीत संबंधितांचे 3 वर्षे वास्तव्य हवे, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असल्याचा पुरावा हवा, एका मुलीनंतर किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे, मुलाचा जन्म झालेला नसावा.

स्वरूप - एक मुलगी असल्यास महापालिका 10 हजार रुपये किंवा दोन मुली असल्यास महापालिका प्रत्येकी पाच हजार रुपये "यूटीआय'च्या योजनांत 18 वर्षांच्या मुदतीने गुंतविले जातात. मुदतीनंतर पालकांना एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते.
लाभार्थी - 2015-16 - 58, 2016-17 - 22

Web Title: pune news lek ladaki scheme