दहा वर्षांत ५० बछडे आईच्या कुशीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

अनेकदा पहिल्या दिवशीच आई पिले घेऊन जात असल्याचे आढळून आले. मात्र, काही वेळा यास एक ते दोन दिवसदेखील लागले आहेत. तोपर्यंत त्यांची काळजी निवारा केंद्रात घेण्यात येते. पिलांना पुन्हा आईकडे सोपविण्यात आल्याने पिलांअभावी सैरभैर झालेल्या मादीकडून उपद्रव होण्यास प्रतिबंध झाला आहे.
- डॉ. अजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी, माणिकडोह बिबट निवारा केंद्र

जुन्नर - माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्‍यू पथकाच्या प्रयत्नातून गेल्या दहा वर्षांत बिबट्यांच्या पन्नास बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सोपवण्यात यश आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली. 

शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजी येथील रामदास खोमणे यांच्या शेतात बिबट्याचे चार बछडे सापडले होते. अवघे वीस दिवस वय असलेल्या या बछड्यांमध्ये दोन नर व दोन मादी बछडे होते. त्यांना रात्री पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्यात यश आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

धोलवड (ता. जुन्नर) येथे २८ जानेवारी २००९ मध्ये बिबट्याच्या दोन आठवडे वयाच्या नर बछड्यास मादीकडे सोपविण्यात आले होते. तेव्हापासून शनिवारच्या शिरूर येथील घटनेपर्यंत पंधरा ते चार महिने वयाचे पन्नास बछडे आईच्या कुशीत यशस्वीपणे विसावले आहेत. 

यात सर्वाधिक ३० बछडे जुन्नर तालुक्‍यातील जुन्नर, ओतूर व नारायणगाव वनपरिक्षेत्रातील विविध गावांतील आहेत; तर शिरूर तालुक्‍यातील संख्या १५ इतकी आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर व नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील अनुक्रमे दोन व तीन बछड्यांचा यात समावेश आहे. ज्या ठिकाणी बछडे मिळाले तेथेच रात्रीच्या वेळी सोडून देण्यात येतात. त्यांना बिबट्याची मादी घेऊन जाते की नाही, याचे चित्रणदेखील केले जाते.

Web Title: pune news leopard