पुण्याच्या "स्मार्ट सिटी'कडून नाशिक घेणार अनुभवाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पुणे - 'स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुण्यातील काम वेग घेत असून, त्याला नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आशादायी आहे. येथील कामे आणि अधिकाऱ्यांचे अनुभव नाशिकसाठी मार्गदर्शक ठरतील. अनुकरणशील अशा विकासकामांचे व कार्यपद्धतीचे धडे नाशिक मध्येही गिरविले जातील,'' असे प्रतिपादन नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केले.

स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुण्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विकासकामांची पाहणी करण्यासाठी थविल यांच्यासह मुख्य नगररचनाकार कांचन बोधले, मुख्य अभियंता मनोहर पोकळे, कंपनी सेक्रेटरी महेंद्र शिंदे यांनी नुकताच पुण्याचा एकदिवसीय अभ्यास दौरा केला.

नाशिक शहराचा स्मार्ट सिटी मोहिमेतील समावेश दुसऱ्या टप्प्यात झाला आहे. पुण्याचे काम एक वर्ष अगोदर सुरू झाल्याने प्रत्यक्ष प्रकल्पांच्या कामांना सुरवात झाली आहे. औंधमधील पुनर्रचना केलेला रस्ता, सायकल लेन, प्लेसमेकिंग, नागरी समस्या निवारण व्यवस्था, आधुनिक वास्तुरचनाशास्त्रानुसार बनविलेले पदपथ, स्पीडब्रेकर, लोकांना बसण्यासाठीची केलेली खास व्यवस्था नाशिकच्या पथकाने पाहिली. तसेच सिंहगड रस्त्यावरील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि इतर सहकाऱ्यांकडून दृष्टिपथात असणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती घेतली.

"कॉर्पोरेट टच' अत्यावश्‍यक
कामाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यथाशक्ती वापर करत "कॉर्पोरेट टच' देऊन कामे करणे आवश्‍यक आहे. विकासकामांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी करून घेतल्यास कामे अधिक लोकाभिमुख होतात. कार्यपद्धतीचा ढाचा स्मार्ट सिटी मोहिमेत बदलला जात आहे, असे पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

Web Title: pune news Lessons from experience in Nashik from Pune's Smart City