खंडाळ्याच्या शिवारात रंगले साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जोपर्यंत शिवारातील माणसे लिहित आहेत, साहित्याचा आनंद घेत आहेत तोपर्यंत भाषेची आणि साहित्याची काळजी करण्याची गरज नाही. शिवारातील माणसांनीच आजवर मराठी भाषा टिकवली आहे

पुणे - मंडप नाही, कसला भपकेपणा नाही, कुण्या पुढाऱ्यांना निमंत्रण नाही, ना कोणाचे सत्कार-सोहळे, ना कोणाचे रुसवे-फुगवे. बळिराजाच्या सहवासात माती, नाती आणि संस्कृतीचा जागर करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पहिले "शिवार साहित्य संमेलन' खंडाळा तालुक्‍यातील अजनुज या गावातील शिवारात रंगले.

ग्रामीण भागातील वाचकांना जोडून घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, खंडाळा शाखा आणि ज्ञानदीप क्रेडिट को-ऑप सोसायटी यांच्या वतीने नुकतेच हे संमेलन घेण्यात आले. ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे यांचे अध्यक्षीय भाषण, ग्रामीण कादंबरीकार शंकर कवळे यांचा विशेष सत्कार, कवी संमेलन, कथाकथन, व्याख्यान असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात गावकऱ्यांना अनुभवायला मिळाले. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी, खंडाळा शाखेचे अध्यक्ष विलास वरे, लेखक शंकर कवळे, जिजाबा पवार उपस्थित होते.

कोकरे म्हणाले, ""जोपर्यंत शिवारातील माणसे लिहित आहेत, साहित्याचा आनंद घेत आहेत तोपर्यंत भाषेची आणि साहित्याची काळजी करण्याची गरज नाही. शिवारातील माणसांनीच आजवर मराठी भाषा टिकवली आहे.''

प्रा. जोशी म्हणाले, ""परिषद ही केवळ महानगरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत, शिवारापर्यंत पोचत आहे, ही समाधानाची बाब आहे. साहित्य रसिकांना संमेलनापर्यंत पोचणे शक्‍य नसेल तर संमेलनांनी त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे, या भूमिकेतून हे संमेलन घेण्यात आले.''

Web Title: pune news: literary meet