गिर्यारोहणाची लाइव्ह "सफर' 

गिर्यारोहणाची लाइव्ह "सफर' 

पुणे - रायगडवरील गिर्यारोहण मोहिमेचा लाइव्ह व्हिडिओ अमितने "फेसबुक'वर शेअर करताच काही क्षणांत तो पाहणाऱ्यांची संख्या पाचशेवर पोचली...डोंगरदऱ्या, निसर्गरम्य स्थळे आणि विविध ठिकाणी भटकंती करणाऱ्या गिर्यारोहकांकडून "लाइव्ह'चा फंडा सर्रास वापरला जात आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही गिर्यारोहण "लाइव्ह' केले जात आहे. गिर्यारोहकांचा हा भन्नाट अनुभव घरबसल्या घेण्याचा आनंदही नेटिझन्सना मिळत आहे. 

सध्या विकेंड्‌ला गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या तरुण-तरुणींकडून असे लाइव्ह व्हिडिओ शेअर केले जातात. गिर्यारोहण संस्थांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरही मोहिमांचे लाइव्ह व्हिडिओ पाहायला मिळतात. गिर्यारोहक आणि गिर्यारोहण संस्थांकडून मोहिमांचे सोशल मीडिया प्रमोशन वाढल्यामुळे असे लाइव्ह व्हिडिओ फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अँड्रॉइड मोबाईल आणि फोरजी नेटवर्कमुळे तरुण-तरुणींना लाइव्ह व्हिडिओ शेअर करणे शक्‍य होत असून, याद्वारे निसर्गरम्य ठिकाणांशी लोक थेट जोडले जात आहेत. 

याबाबत गिर्यारोहक अमित कोदरे म्हणाला, ""दोन ते तीन वर्षांपूर्वी हा पर्याय उपलब्ध नव्हता; पण आता या नव्या पर्यायाचा वापर वाढला असून, मोहिमांना येऊ न शकलेल्यांना त्याबाबतची संपूर्ण माहिती लाइव्ह व्हिडिओतून पाहता येते. माझ्या ग्रुपमधील सर्व जण गडकिल्ल्यांवरील मोहिमांचे लाइव्ह व्हिडिओ नेहमीच शेअर करतात. यातून मोहिमांची प्रसिद्धी होतेच; पण लोकांनाही घरबसल्या विविध ठिकाणांची माहिती मिळते.'' 

सोशल मीडिया प्रमोशन 
गिर्यारोहणासाठी कुठे जावे इथंपासून ते नवे पर्याय कोणते...अशा विविध गोष्टींची माहिती तरुण-तरुणींना सोशल मीडियाद्वारे मिळत आहे. गिर्यारोहण संस्थांकडून मोहिमांची प्रसिद्धी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केली जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरसह व्हॉट्‌सऍप आणि एसएमएसद्वारे मोहिमांची माहिती देण्यात येते. मोहिमेसाठीचा खर्च असो वा मोहिमेचे स्वरूप...सोशल मीडियाद्वारे याबाबतची सविस्तर माहिती तरुणांपर्यंत पोचवली जात आहे. 

व्हिडिओतून सामाजिक संदेश 
गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या लाइव्ह व्हिडिओचा वापर केला जात आहे. तसेच गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेपासून संवर्धनापर्यंतचे सामाजिक संदेश व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोचविले जात आहे. खासकरून गिर्यारोहण संस्थांकडून त्याचा अधिक वापर होत आहे. 

गडकिल्ल्यावर गेल्यानंतरचा सूर्यास्त असो वा निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला एखादा क्षण...अशा प्रत्येक गोष्टीचे छायाचित्र आपल्याला फेसबुक आणि इस्टाग्रामवर पाहायला मिळेल. छायाचित्रणाची आवड असलेले हौशी गिर्यारोहक आणि छायाचित्रकारांकडून मोहिमांचे लाइव्ह अपडेट्‌स छायाचित्रांच्या माध्यमातूनही शेअर केले जातात. त्यासाठी त्यांनी खास फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज तयार केले आहेत. याद्वारे लोकांना त्या-त्या ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळण्यासह येथील उत्तम छायाचित्रे पाहायला मिळतात. 
- आशिष काळे, छायाचित्रकार 

सध्या तरुणांमध्ये गिर्यारोहणाचे प्रमाण वाढले आहे; पण गिर्यारोहणाला जाताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. सेल्फी, छायाचित्र आणि लाइव्ह करताना काही जणांनी आपला जीवही गमावला आहे. मग अशा परिस्थितीत आपण दक्षता घेतली पाहिजे. गडकिल्ल्यांचे बुरुज असो वा तटबंदी तेथे जाऊन छायाचित्रे काढू नये. तसेच छायाचित्र आणि सेल्फी घेताना काही मर्यादा पाळाव्यात. छायाचित्रासाठी कोणतेही धाडस करू नये. गिर्यारोहण करा; पण स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 
- उमेश झिरपे, गिरीप्रेमी संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com