विद्यार्थ्यांना दहा दिवसांत दाखले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पुणे - विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेले दाखले वेळेत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या कामासाठी यंदा प्रथमच १२ उपजिल्हाधिकारी आणि सहा तहसीलदारांची नेमणूक केली आहे. अर्ज केल्यानंतर दहा दिवसांमध्ये दाखले देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नागरी सुविधा केंद्रात या दृष्टीने नियोजन केले आहे.

पुणे - विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेले दाखले वेळेत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या कामासाठी यंदा प्रथमच १२ उपजिल्हाधिकारी आणि सहा तहसीलदारांची नेमणूक केली आहे. अर्ज केल्यानंतर दहा दिवसांमध्ये दाखले देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नागरी सुविधा केंद्रात या दृष्टीने नियोजन केले आहे.

शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्न, क्रिमिलेअर आणि अधिवास यासह विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांत विद्यार्थी-पालकांची झुंबड उडते. थोड्या कालावधीत हजारो अर्ज आल्याने जिल्हा प्रशासनाचीही दाखले देताना धांदल उडते. या पार्श्वभूमीवर निकालापूर्वीच दाखले न्यावेत, असे आवाहन दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते, तरीदेखील निकालानंतर दाखले घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे दाखले देण्यास उशीर लागतो. हे लक्षात घेऊन गेल्या वर्षी दाखले देण्यासाठी अर्ज केल्यानंतर वीस दिवस लागतील, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते; मात्र प्रवेशाच्या काळात ही मुदत मोठी असल्याने विद्यार्थी-पालकांसमोर अडचणी येण्याची शक्‍यता असते.

यामुळे यंदा वीस दिवसांऐवजी दहा दिवसांमध्ये हे दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. विविध दाखल देण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘अर्जांची प्राथमिक छाननी, ॲफिडेव्हिट करून देणे ही कामे करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे; मात्र वेगाने कामे पूर्ण होण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी अर्जातील आवश्‍यक माहिती अचूक भरावी आणि आवश्‍यक कागदपत्रे व्यवस्थित जोडावीत. तसेच तातडीने दाखले उपलब्ध करून देण्यासाठी १२ उपजिल्हाधिकारी आणि सहा तहसीलदारांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामध्ये समसमान कामाचे वाटप केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.’’

विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले हे शिवाजीनगर गोदामातील नागरी सुविधा केंद्राबरोबरच शहरात असलेल्या महा ई-सेवा केंद्रातूनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी मध्यस्थांची मदत घेऊ नये, अथवा कोणी त्यासाठी जादा पैसे मागितल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: pune news living certificate in 10 days