कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक- वळसे पाटील

युनूस तांबोळी
रविवार, 9 जुलै 2017

राज्यात मोठ्या प्रमाणात विजेची उपलब्धता होऊन देखील लोड शेडींगला सामोरे जावे लागत आहे. विजेच्या अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यासाठी लवकरच उर्जामंत्र्याची बैठक ही शिरूर व आंबेगाव या तालुक्यात घेणार असल्याचे त्यांनी वळसे पाटील यांनी सांगितले. 

टाकळी हाजी : राज्यात सरकारकडून कर्जमाफी म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नसून शेतकरी आर्थीक संकटात सापडत चालला आहे. शेतीव्यवसाय करीत असताना पाण्यावर हक्क दाखवित पाणी पट्टी भरून पाण्याची वहिवाट दाखवा. अन्यथा धरणात साठविलेले पाणी डोळ्यासमोरून दुसरे कोणी हिसकावून घेऊन जाईल. भविष्यात पाणी प्रश्नावर मोठा संघर्ष करावा लागणार असल्याने आत्तापासून संघटित व्हा. असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रिय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. 

टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे बापूसाहेब गावडे विद्यालयात झालेल्या शैक्षणिक मेळाव्यात ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, राज्यात तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी वैद्यकिय व अभियांत्रीकी कॅालेज सुरू करून शिक्षणाचा विस्तार केला. त्यात 1 लाख 40 हजार जागा नव्याने उपलब्ध करून दिल्या. त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी देखील ज्ञानार्जन करत असताना स्पर्धात्मक जगात कोणता अनुभव गरजेचा आहे ते शोधा. विद्यार्थ्यांनी परीक्षेत गुण वाढविण्यापेक्षा दर्जात्मक गुणवत्ता प्राप्त करून घ्यावी. औद्योगीक वसाहती वाढवून तरूणांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त करून द्यायची होती. मात्र गुणवत्ता नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची मुले ही वेटबिगारी करताना दिसतात. अधिकारी पदासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास व सादरीकरणावर अधिक भर दिला पाहिजे. त्यातून उच्च पदापर्यंत सर्वसामान्य विद्यार्थी पोहचू शकतील. 

सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर बाबूराव खोमणे यांना चारचाकी व दुचाकी भेट देण्यात आली. पुणेरी पगडी देऊन त्यांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.   
यावेळी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत, जिल्हा बॅकेचे संचालक पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, वर्षाताई शिवले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, जिल्हा परीषद सदस्य पांडूरंग पवार, सुनीता गावडे, घोडगंगेचे संचालक राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, कृषी अधिकारी संजय पिंगट, बाजार समितीचे सभापती शशीकांत दसगुडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, डॅा. सुभाष पोकळे, सरपंच दामुशेठ घोडे, उपसरपंच अजीत गावडे, सरपंच योगेश थोरात, सुदाम इचके, निळुभाऊ टेमगिरे, माजी मुख्याघ्यापक शिवाजीराव धायगुडे, बाबाजी निचीत, वासुदेव जोरी, निळुभाऊ टेमगिरे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर. बी. गावडे यांनी केले. दौलत सोनवणे यांनी आभार मानले. 

राज्यात मोठ्या प्रमाणात विजेची उपलब्धता होऊन देखील लोड शेडींगला सामोरे जावे लागत आहे. विजेच्या अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यासाठी लवकरच उर्जामंत्र्याची बैठक ही शिरूर व आंबेगाव या तालुक्यात घेणार असल्याचे त्यांनी वळसे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: pune news loan waiver dilip walse patil