लॉकर आणि पार्किंगचीच चर्चा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे १२ ऑगस्टला उद्‌घाटन 

पुणे - नवीन कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या बार रूममधील ‘लॉकर’ आणि आवारातील पार्किंगचे व्यवस्थापन, हे मुद्दे पुढील काळात आव्हान ठरणार आहे. कोणत्याही वादाविना यावर तोडगा काढण्यात येणार का? उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना स्थान मिळणार का? या विषयांवर गेल्या तीन चार दिवसांपासून न्यायालयात चर्चा रंगली आहे.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर कौटुंबिक न्यायालयाची नवीन इमारत उभी राहिली आहे. त्यामध्ये वकिलांसाठी बार रूम बांधले असून, वकिलांसाठी लॉकरही बसविले जाणार आहे; मात्र लॉकरचे वाटप हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कौटुंबिक न्यायालयातही वकिलांची संघटना असून, ती पुणे बार असोसिएशनशी संलग्न आहे. या वकिलांना प्राधान्याने हे लॉकर देण्यात यावे, अशी मागणी तेथील वकिलांची आहे, तर जिल्हा न्यायालयातील नवोदित वकिलांनाही लॉकर मिळाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. यामुळे लॉकर वाटपाचा प्रश्‍न पुढील काळात महत्त्वाचा ठरणार आहे. 

या प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या ठिकाणी एक हजार लॉकर बसविता येतील, अशी जागा उपलब्ध असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या इमारतीचे १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. या उद्‌घाटन समारंभाला पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनादेखील व्यासपीठावर स्थान मिळाले पाहिजे, कार्यक्रमपत्रिकेतही त्यांचे नाव असावे, असे मत वकिलांकडून व्यक्त केले जात आहे. 

पार्किंगबाबतही दक्षता घेण्याची गरज 
या इमारतीच्या आवारातील पार्किंगच्या जागेचा योग्य वापर हादेखील तेवढाच गंभीर विषय आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील जागा पार्किंगला अपुरी पडत आहे. कौटुंबिक न्यायालयात पार्किंगसाठी जागा उपलब्ध होणार असून, या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काय उपाय केले जातील, याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: pune news locker & parking discussion