लोहगाव विमानतळाची भरारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

पुणे -- जागतिक विमानतळ सर्वेक्षणात चांगल्या सुविधा देणाऱ्या 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांच्या गटांत पुण्याच्या लोहगाव विमानतळाने भरारी मारत तिसरा क्रमांक पटकवला आहे. देशातील 25 विमानतळांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या या सर्वेक्षणात पुण्याने पहिल्यांदाच जागतिक स्तरावर लौकिक मिळविला आहे. 

एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (एएसक्‍यू) आणि एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) यांच्यातर्फे हे सर्वेक्षण झाले. 34 निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. या गटात हैदराबाद विमानतळाने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. इंडोनेशियाचा बालीकाप्पण आणि चीनमधील बाईटा विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे, कोचीन आणि कोलकता यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळांनीही अन्य गटांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

निवडीचे प्रमुख निकष 
- प्रवाशांचे चेक-इन 
- मिळणाऱ्या पायाभूत सुविधा 
- विमानतळापर्यंत पोचण्यासाठीच्या सुविधा 

लोहगाव विमानतळावरून दर वर्षी 80 लाख प्रवाशांची वाहतूक होऊ लागली आहे. हवाई दल, विमानतळ कर्मचारी, केंद्रीय विमानतळ सुरक्षा दल आणि पूरक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या सर्वच घटकांचे हे संयुक्त यश आहे. विमानतळ उत्कृष्ट व्हावा म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या प्रयत्नांचा हा बहुमान आहे. 
- अजय कुमार, संचालक, लोहगाव विमानतळ 

पुणे विमानतळासाठी ही उत्साहवर्धक बाब आहे. त्याचे श्रेय प्रवाशांनाही आहे. कारण चांगली सेवा मिळावी म्हणून प्रवाशांनी सातत्याने आग्रह धरला आहे. पुण्याची क्षमता, विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अजूनही सुधारणांना मोठा वाव आहे. डिसेंबर 16 मधील तिमाही सर्वेक्षणात लोहगाव विमानतळाला 4.78 गुण मिळाले होते. आता 4.80 गुण मिळाले असून, 4.85 गुणांचे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. 
- धैर्यशील वंडेकर, विश्‍लेषक, हवाई वाहतूक 

Web Title: pune news Lohegaon Airport pune