लोहगाव विमानतळाचे जूनमध्ये विस्तारीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

हवाई दलाने लोहगाव विमानतळासाठी नुकतीच १५.५ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या जागेच्या माध्यमातून विमाने उभी करण्यासाठी स्टॅंड निर्माण करणे आणि अनुषंगिक कामे होतील
- अजय कुमार, संचालक, लोहगाव विमानतळ

पुणे - लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि प्रवासीकेंद्रित पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच्या कामाला जूनमध्ये प्रारंभ होणार आहे. सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होईपर्यंत लोहगाव विमानतळ पुणेकरांची विमान प्रवासाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम होणार आहे.   

लोहगाव विमानतळावर प्रवासी संख्या वाढत असताना विविध विमानांच्या फेऱ्याही वाढू लागल्या आहेत. पुरंदरमधील नवे विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी किमान पाच वर्षांहून अधिक काळ लागणार असल्यामुळे तूर्त लोहगाव विमानतळ सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी त्याबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यात लोहगाव विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती शिरोळे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळावरील धावपट्टीची लांबी विमानतळाच्या पूर्वेला वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई दलाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.’’

पंचवीस एकर जागा अजून उपलब्ध व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यातून सुमारे १५ एकर जागा हवाई दलाला दिली जाणार आहे. तसेच उर्वरित दहा एकर जागेत कार्गो विमानतळासाठी सुविधा आणि वाहने उभी करण्यासाठीची व्यवस्था निर्माण होईल, असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी स्पष्ट केले. 

पंचवीस एकरपैकी १० एकर जागा खासगी मालकीची आहे. तिचे भूसंपादन करण्यासाठी संबंधित जागामालकांशी महापालिकेच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. लवकरच त्याबाबतची प्रक्रिया वेग घेईल. विमानतळ विस्तारीकरणाचे काम जूनमध्ये नेमके सुरू होईल, असेही त्यांंनी सांगितले.

८,३५० मीटर धावपट्टीची सध्याची लांबी
आंतरराष्ट्रीय व लांब पल्ल्याच्या विमानांसाठी ३,३०० मीटरचे आणखी विस्तारीकरण हवे
विमानतळावरील उड्डाणांची रोजची संख्या १७२
प्रवाशांची दररोजची संख्या (हजारांत) २२
देशांतर्गत थेट विमानसेवा (शहरे) २२
परदेशातील उड्डाणे (शहरांत) ४

Web Title: pune news lohgaon airport development