लोहगाव विमानतळाचे मूल्यांकन होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे - देशातील काही ठराविक विमानतळांवरील हवाई वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी पुढील सात महिन्यांच्या हवाई वाहतुकीचे विशेष मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पुण्यातील लोहगाव विमानतळाचाही समावेश करण्यात आला आहे.

पुणे - देशातील काही ठराविक विमानतळांवरील हवाई वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी पुढील सात महिन्यांच्या हवाई वाहतुकीचे विशेष मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पुण्यातील लोहगाव विमानतळाचाही समावेश करण्यात आला आहे.

विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी या परीक्षणाचा फायदा होणार आहे. भारतीय विमान कंपन्यांनी एक हजाराहून अधिक नवीन विमानांची मागणी केली असून, येत्या काळात ती दाखल होतील.

त्यामुळे भारतातील देशांतर्गत विमानसेवा ही जगातील तीन क्रमांकाची सेवा ठरणार आहे. त्या वेळी विमानतळांची क्षमता वाढविणे मोठे आव्हान असणार आहे. उपलब्ध टर्मिनलची क्षमता आणि प्रवासीवाढीचा अंदाज याचा विचार केला जाणार आहे. त्याबरोबरच विमानतळावर येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक अन्य बाबींही तपासल्या जाणार आहेत. त्यामध्ये बॅगेज ट्रॉली, वाहन पार्किंग, काउंटर यांचा समावेश आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या (आयटा) अहवालानुसार हवाई वाहतुकीमध्ये भारत इंग्लंडला मागे टाकून 2026 पर्यंत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावेल. भारतातील विमान प्रवाशांची सध्याची वार्षिक संख्या सुमारे 12 कोटी आहे. 2035 पर्यंत ती 44 कोटी 20 लाखांच्या घरात पोचेल, असे या अहवालात म्हटले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकता या महानगरांतील विमानतळांवरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.

त्याबरोबरच पुणे, जयपूर, श्रीनगर, लखनौ, डेहराडून आदी महत्त्वाच्या विमानतळांवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने (सीएपीए) देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. देशात अग्रस्थानी असलेल्या विमानतळांवरील प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होणार आहे, असेही सीएपीएने म्हटले आहे.

प्रवाशांच्या संख्येत वाढ
गेल्या तीन वर्षांत लोहगाव विमानतळावर प्रवासी संख्येत जवळपास 30 लाख प्रवाशांची संख्या वाढली आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. नॉन मेट्रोच्या यादीत पुणे शहर येत असल्यामुळे आणि हवाई प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे लोहगावचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news lohgaon airport evaluation