छुप्या भारनियमनाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवल्याचा दावा दरवेळेस महावितरण करते; परंतु आजही मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांत दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरण करीत असलेल्या छुप्या भारनियमनामुळे नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर दरवर्षीच वीज जाण्याच्या घटना वारंवार घडतात. एकीकडे छुपे भारनियमन आणि दुसरीकडे पावसाळ्यातील विजेचा लपंडाव याचा फटका सामान्य नागरिकांनाच बसतो आहे. 

पुणे - देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवल्याचा दावा दरवेळेस महावितरण करते; परंतु आजही मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांत दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरण करीत असलेल्या छुप्या भारनियमनामुळे नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर दरवर्षीच वीज जाण्याच्या घटना वारंवार घडतात. एकीकडे छुपे भारनियमन आणि दुसरीकडे पावसाळ्यातील विजेचा लपंडाव याचा फटका सामान्य नागरिकांनाच बसतो आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यासाठी विजेचा मुबलक पुरवठा आहे, कोठेही भारनियमन नाही असे महावितरणकडून नेहमीच सांगण्यात येते; परंतु वास्तव निराळे आहे. मध्यवर्ती पुण्यातील सतरा पेठांसह उपनगरांत वारंवार वीज जाण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. ऐन उन्हाळ्यातही पुणेकरांना छुपे भारनियमन सहन करावे लागले. पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही स्थिती ‘जैसे थे’ आहे. शहराला पुरेल एवढी वीज उपलब्ध असल्याचा दावा महावितरणकडून केला जातो. असे असूनही वीजपुरवठा खंडित करण्याचे कारण विचारले तर महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, अशा तक्रारी शहर व उपनगरांतील नागरिकांनी ‘सकाळ’कडे बोलून दाखविल्या. वीजबिल भरल्यानंतरही दुप्पट रकमेचे बिल येणे, अंतिम तारखेनंतर वीजबिल मिळणे, मीटर रीडिंग व्यवस्थित न घेणे, दुप्पट, तिप्पट वीजबिल आकारणे, ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखल न घेणे यांसारख्या तक्रारी महावितरणबाबत ग्राहक नेहमीच करतात. बहुतांश वेळेला महावितरणतर्फे फीडर पिलर, ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचे कारण देण्यात येते. देखभाल दुरुस्तीच्या नियोजित कामांबाबत महावितरणकडून वर्तमानपत्रांतून अधिकृत माहिती देण्यात येते; परंतु तरीही इतर दिवशी वीज जाण्याचे समाधानकारक उत्तर महावितरणचे अधिकारी देऊ शकले नाहीत. 

विशेषतः कात्रज, उंड्री, पिसोळी, कोंढवा, गुजरवस्ती, हडपसर, कोथरूड, सिंहगड रस्ता परिसर, वडगाव धायरी, नऱ्हे-आंबेगाव, कर्वेनगर, वारजे माळवाडी, उत्तमनगर, बाणेर, बालेवाडी, वडगाव शेरी, येरवडा, विमाननगर, धनकवडी, आंबेगाव बुद्रुक या उपनगरांमध्ये वीज जाण्याच्या घटना मे महिन्यात वारंवार घडल्या. महावितरणकडे तक्रारी करूनही ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाले असेल, अशी उदाहरणे क्वचितच सापडतील. 

वीज गेल्याने मोटर बंद, परिणामी पिण्याचे पाणी वरच्या टाकीत न चढल्याने घरातील सर्वच कामे रेंगाळतात. अंधारात बसावे लागते. विजेअभावी मुलांचा अभ्यासही घेता येत नाही.
- निशिगंधा चोळके, गृहिणी, धनकवडी बालाजीनगर 

माझ्या घराजवळ ट्रान्सफॉर्मर आहे; पण तो नेहमीच बंद पडतो. पावसाळ्यात तर नागरिकांचे हाल होतात. मागच्या महिन्यात आठवड्यातून दोन-तीन दिवस वीज जात होती. तक्रार तरी किती वेळा करायची. 
- अश्‍विनी काळे, घोरपडी गाव 

गुजरवस्ती भागात लोकवस्ती जास्त आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यावर ताण येत असावा. वीज गेल्याने घरच्या गिरणीचा उपयोग होत नाही. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नही वाया जाते. वारंवार विजेचा लपंडाव सहन करावी लागणारी उपनगरे शहरातील खेडीच झाली आहेत.
- सुवर्णा जाधव, गुजरवस्ती, कात्रज 

गुरुवारव्यतिरिक्त अन्य दिवशीही अर्धा-पाऊण तास वीज जाते. भारनियमन नाही म्हणायचे आणि छुप्या पद्धतीने ते करायचे ही ग्राहकांची फसवणूक आहे. अंतिम तारखेनंतर काही वेळेस बिले पाठवितात. त्यावर दंडही आकारतात. दहा-वीस रुपयांकडे नागरिक पाहत नाहीत; परंतु हीदेखील ग्राहकांची फसवणूक आहे.
- दिलीप पिंगळे, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर 

आम्ही कर्वेनगरमध्ये वसतिगृह चालवितो. सुटीच्या दिवशी वसतिगृहातील मुली त्यांच्या ऑफिसची कामे घरी आणून करतात; पण वीज गेल्याने मोबाईलही चार्ज करता येत नाही. परदेशातून त्यांचे नातेवाईक फोन करतात; परंतु त्यालाही त्यांना मुकावे लागते. 
- सतीश जवळकुटे, कर्वेनगर 

खडकी, औंध रस्ता, भाऊ-पाटील रस्ता, बोपोडी गावठाण या भागात सातत्याने सकाळी व मध्यरात्री वीज जाते. आठवड्यातून तीन-चार वेळा असे घडते. चव्हाण वस्ती, कांबळे वस्ती, बाराते वस्ती; तसेच उच्चस्तरीय सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. विजेची उपकरणे बंद राहिल्याने स्वयंपाकही वेळेवर होत नाही. 
- वैशाली शेलार, गृहिणी, औंध 

अप्रत्यक्ष भारनियमनाचे परिणाम 
मोटर बंद राहिल्याने पाण्याच्या टाक्‍या भरणे अशक्‍य होते. 
दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम. 
घरातील पिठाची गिरणी बंद ठेवावी लागते. 
फ्रिजमधील अन्नपदार्थ, भाज्या नासतात. 
कपड्यांना इस्त्री करता येत नाही. 
गिझर बंद राहिल्याने पाणी तापवू शकत नाही. 
वातानुकूलन यंत्र बंद राहिल्याने उकाड्याने नागरिकांचे हाल. 
अंधारात विषारी डासांचा प्रादुर्भाव वाढतो.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना अंधारात बसावे लागते. 
लहान बाळांच्या संगोपनात अडथळा येतो. 
विजेअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा. 
अंधूक प्रकाशात वेळप्रसंगी मेणबत्त्या लावाव्या लागतात.

पुणे परिमंडल

विजेची गरज २७०० मेगावॉट
पुणे जिल्हा ३० लाख वीजग्राहक
घरगुती ग्राहक ७५ टक्के
औद्योगिक ग्राहक १५ टक्के
व्यावसायिक ग्राहक १० टक्के

वीजबिल भरणा केंद्रे शनिवार, रविवारी सुरू
पुणे - वीजग्राहकांना थकबाकी व वीजबिलांचा भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) सुरू राहतील, असे महावितरणने कळविले आहे. पिंपरी-चिंचवड तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील केंद्रेही सुरू 
राहणार आहेत.

Web Title: pune news loss by hidden loadshading