थोरल्या भावाच्या मृत्यूवार्तेने धाकट्याने सोडला प्राण

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मंचर (पुणे) : थोरल्या भावाचे निधन झाल्याची माहिती समजल्यानंतर धाकट्या भावानेही प्राण सोडल्याची घटना रांजणी (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. 28) घडली. शेतकरी कुटुंबातील या दोन सख्ख्या भावांचे प्रेम सर्वश्रुत होते. ते दोघेही वृद्धापकाळामुळे आजारी होते. सखाराम महादेव वाघ (वय 90) व तुकाराम महादेव वाघ (वय 85) अशी निधन झालेल्या या दोन भावांची नावे असून, सखाराम वाघ यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.

सखाराम वाघ हे मुंबईत गिरणी कामगार म्हणून, तर तुकाराम वाघ हे ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करत होते. तीस वर्षांपूर्वी दोघेही मुंबई सोडून रांजणी येथे त्यांच्या गावी आले. त्यांनी शेती विकसित करण्यासाठी काम केले. कांदा, बटाटा व तरकारी मालाचे ते भरघोस उत्पादन घेत होते. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सखाराम वाघ यांचे रविवारी सकाळी अकरा वाजता निधन झाले. त्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुकाराम वाघ हे आजारी असल्याने थोरल्या भावाच्या निधनाची माहिती त्यांना समजू नये याची काळजी कुटुंबातील नातेवाईक व सदस्य घेत होते. मात्र अंत्यसंस्कारानंतर घरी आलेले पाहुणे व कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुकाराम वाघ यांना संशय आला. काहीतरी विपरीत घडल्याचे त्यांनी ओळखले. बंधू सखाराम यांचे निधन झाल्याची माहिती कळाल्यानंतर ते अस्वस्थ झाले आणि थोड्या वेळानंतर त्यांनी प्राण सोडले. दोन बंधूमधील या प्रेमाची व अतूट मैत्रीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सख्खे भाऊ पक्के मित्र
जेवण आणि देवदर्शनाचा प्रवास ते दोघेही एकत्रच करायचे. दोघांमधील गप्पा व हास्य विनोद पाहून नवख्या माणसाला हे दोन जिवलग मित्र आहेत असेच वाटत होते.

Web Title: pune news machar younger brother death news of the eldest brother