आणीबाणीवर बोललो तर काय चुकले? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे - ""मी आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले, मात्र "इंदू सरकार' चित्रपटामुळे झालेला त्रास कधीच विसरणार नाही. "आणीबाणी' वर यापूर्वी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम झाले. अनेकांनी पुस्तके, लेख लिहिले. तेव्हा, लेखकांना त्यांची पुस्तके दाखवा असे कोणी म्हटले नाही. मग मी चित्रपटाद्वारे आणीबाणीवर बोललो तर काय चुकले? चित्रपटांना कायम लक्ष्य केले जाते,'' अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रविवारी व्यक्त केली. 

पुणे - ""मी आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले, मात्र "इंदू सरकार' चित्रपटामुळे झालेला त्रास कधीच विसरणार नाही. "आणीबाणी' वर यापूर्वी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम झाले. अनेकांनी पुस्तके, लेख लिहिले. तेव्हा, लेखकांना त्यांची पुस्तके दाखवा असे कोणी म्हटले नाही. मग मी चित्रपटाद्वारे आणीबाणीवर बोललो तर काय चुकले? चित्रपटांना कायम लक्ष्य केले जाते,'' अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रविवारी व्यक्त केली. 

सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टतर्फे "दिग्दर्शकाच्या नजरेतून' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमरापूरकर यांच्या कन्या रीमा अमरापूरकर यांनी मुलाखतीद्वारे भांडारकर यांच्याशी संवाद साधला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू, "साधना साप्ताहिक'चे संपादक विनोद शिरसाठ, संस्थेच्या विश्वस्त सुनंदा अमरापूरकर, राजाभाऊ अमरापूरकर उपस्थित होते. 

भांडारकर म्हणाले, ""इंदू सरकार चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मला खूप त्रास झाला. काही राजकीय कार्यकर्त्यांनी माझे तोंड काळे करण्यापासून ते खटले दाखल करण्यापर्यंतचे प्रकार केले. मी या संघर्षाला सामोरा गेलो. मात्र माझ्याजागी दुसरे कोणी असते, तर संपले असते.'' 

"व्हिडिओ कॅसेट विक्रेता ते प्रसिद्ध दिग्दर्शक' हा प्रवास भांडारकर यांनी उलगडला. ते म्हणाले, ""चित्रपटाच्या प्रेमात होतो, काही काळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. "त्रिशक्ती' या माझ्या पहिल्या चित्रपटाला यश मिळाले नाही. तेव्हा सदाशिव अमरापूरकर यांनी बळ दिले. "चॉंदनी बार'च्या यशानंतर पुढे अनेक चित्रपट केले. माझ्या चित्रपटात मानवी भावभावनांना अधिक स्थान दिल्यानेच ते प्रेक्षकांना आवडतात.'' 

तावडे म्हणाले, ""अमरापुरकरांबरोबर अनेक वर्षं ऋणानुबंध होते. ते केवळ कलावंत नव्हते, तर संवेदनशील माणूसही होते. ते ज्या गावात जात तेथील प्रश्न जाणून घेत होते. राजकीय लोकांशी बोलून ते प्रश्‍न सोडवीतदेखील होते.'' 

डॉ. अवचट म्हणाले, ""सदाशिव माणूस म्हणून मोठे होते. त्यांना सामाजिक बांधिलकीची ओढ होती. अतिशय संवेदनशील असलेला हा मित्र माझाच एक भाग होता. तो गेल्याचे दुःख जाणवते.'' प्रास्ताविक शिरसाठ यांनी केले, तर सूत्रसंचालन उमेश गेवरीकर यांनी केले. 

नवोदितांसाठी "प्रोजेक्‍ट साधन' 
ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ट्रस्टने "प्रोजेक्‍ट साधन' हा उपक्रम तयार केला आहे. त्याद्वारे कलाकारांना त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी मदत मिळेल, असे विनोद तावडे यांनी सांगितले. 

"एफटीआयआय'ने तेथील शिक्षणासाठी पदवी लागणार असल्याचे सांगितले. मी सहावी नापास. पण काही वर्षांनी याच संस्थेत मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले. शिक्षणापेक्षा "पॅशन' महत्त्वाची आहे. 
- मधुर भांडारकर, दिग्दर्शक 

Web Title: pune news Madhur Bhandarkar