७० मोर्चे, १६ ठिकाणी दगडफेक अन्‌ २१ ठिकाणी रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे, - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान दलित संघटनांनी शहरात विविध ठिकाणी मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्‍त केला. शहरात दिवसभरात १६ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. कार्यकर्त्यांनी गटागटांनी येऊन खासगी बसेस, पीएमपी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे शहरात आज तणावपूर्ण स्थिती होती; मात्र सायंकाळनंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

दलित संघटनांच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आज एकूण ७० ठिकाणी छोटे-मोठे मोर्चे काढण्यात आले, तर २१ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबवेवाडी येथील अपर इंदिरानगर येथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुणे रेल्वे स्थानकावर येताच रेल रोको केले.

सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, दांडेकर पूल, रेल्वे स्थानकासमोर आणि शिवाजीनगर परिसरात आंदोलकांनी काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडून दिली. शहरात दिवसभरात १२ खासगी आणि ५५ पीएमपी बसेसच्या काचा फोडल्या. राजाराम पुलाजवळ दुचाकींची तोडफोड केली.

शहरात पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त रवींद्र कदम हे स्वत: परिस्थितीवर नजर ठेवून होते. सर्व अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते.

शहरात मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. त्या प्रकरणी सहा पोलिस ठाण्यांत शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ते साधू वासवानी चौकादरम्यान पीएमपी बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्याप्रकरणी सुमारे १५० जणांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कॅम्प येथील एम. जी. रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या ४० जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कॅम्प परिसरात ईस्ट स्ट्रीट रस्त्यावर बसवर केलेल्या दगडफेकीत रसिका आढाव ही महिला प्रवासी जखमी झाली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथे जमावाने रास्ता रोको करून तीन पीएमपी, दोन टेंपो आणि एका टॅंकरवर दगडफेक केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पिंपरी आणि एमआयडीसी येथेही दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बुधवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: pune news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash