"महाराष्ट्र बंद'मुळे रुग्णालयांत शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

ससूनमधील दृष्टीक्षेपात बाह्यरूग्ण विभाग - 
ता. 2 - 2385 रूग्ण 
ता. 3 - 1481 रूग्ण 

पुणे - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा थेट परिणाम वैद्यकीय सेवेवर झाल्याचे चित्र बुधवारी पुण्यात दिसले. महापालिका, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांअभावी शुकशुकाट होता. तसेच डायग्नॉस्टिक सेंटरवर तपासणीसाठी पुढची वेळ घेतल्याची माहिती पुढे आली. 

ससून रुग्णालय, महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथील बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निरीक्षण येथील डॉक्‍टरांनी नोंदविले. खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात आणि डॉक्‍टरांच्या क्‍लिनिकमध्येही नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. मोठ्या रुग्णालयांमधील नियोजित शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा नियमित सुरू असल्याचेही स्पष्ट केले. 

वैद्यकीय तपासण्यासाठी डायग्नॉस्टिक सेंटरवर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. गर्भवती महिलांच्या नियमित सोनोग्राफीच्या वेळा एक ते दोन दिवस पुढे ढकलल्याची माहिती वेगवेगळ्या रेडिओलॉजिस्टनी दिली. औषध विक्रेत्यांच्या दुकानांतही गर्दी कमी दिसली. 

रेडिओलॉजिस्ट डॉ. वीरेन कुलकर्णी म्हणाले, ""वैद्यकीय चाचण्यांच्या तपासण्यासाठी येणारे रुग्ण घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे इतर वेळी प्रतीक्षेत असणाऱ्या केंद्रामध्ये सायंकाळपर्यंत तुरळक गर्दी होती.'' 

डॉ. सचिन गांधी म्हणाले, ""दररोज सकाळी रुग्णांची मोठी गर्दी असते; पण बुधवारच्या "महाराष्ट्र बंद'मुळे बहुतांश रुग्णांनी वेळ बदलून घेतली. वाहतुकीची सोय न झालेल्या काही ज्येष्ठ रुग्णांनीही दूरध्वनी करून वेळा बदलून घेतल्या.'' 

सोनोग्राफीची आवश्‍यकता असलेल्या गर्भवती कमला देशपांडे म्हणाल्या, ""डॉक्‍टरांनी गर्भावस्थेतील नियमित सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी दुपारची वेळही घेतली होती; पण त्या वेळेला शहरात तणाव असल्याची माहिती मिळाल्याने सोनोग्राफीची वेळ बदलून घेतली.'' 

"महाराष्ट्र बंद'चा परिणाम ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागावर प्रकर्षाने दिसून आला. उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या बुधवारी कमी झालेली दिसली. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

Web Title: pune news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash hospital