"तंदुरुस्त बंदोबस्त' स्तुत्य आणि दिशादर्शक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - ""सलग पंचवीस-तीस तास "ऑन ड्युटी' राहून गणेशोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांसाठी "सकाळ'तर्फे सुरू करण्यात आलेला "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम म्हणजे एक स्तुत्य आणि दिशादर्शक पाऊलच आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक केले. 

पुणे - ""सलग पंचवीस-तीस तास "ऑन ड्युटी' राहून गणेशोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांसाठी "सकाळ'तर्फे सुरू करण्यात आलेला "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम म्हणजे एक स्तुत्य आणि दिशादर्शक पाऊलच आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक केले. 

गणेशोत्सव सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजाविणारे पोलिस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावेत, या उद्देशाने "सकाळ' आणि रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयलने आयोजित केलेल्या "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्‍वरी या दुसऱ्या मानाच्या गणपतीसमोर झाला. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले असताना त्यांनी तांबडी जोगेश्‍वरी मंडळाला भेट दिली. त्या वेळी त्यांच्या हस्ते पोलिसांना चिक्कीचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्षे आहे. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष विशाल गुंजाळ, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, सचिव अजय चौधरी, उदय कुलकर्णी, जयंत राजपूत, ऋतुजा गुंजाळ, पूनम चौधरी, "सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, सहयोगी संपादक सुनील माळी हेही या वेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ""तंदुरुस्त बंदोबस्तसारख्या उपक्रमातून आपण पोलिसांना आपल्या कुटुंबातील एक भागच मानत असल्याचे जाणवते. आपल्या कामाची कुणीतरी दखल घेत आहे, ही समाधानाची भावना त्यातून पोलिस बांधवांना प्राप्त होते. असे सामाजिक उपक्रम अधिक प्रमाणात होत राहणे आवश्‍यक आहे.'' 

बापट म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांकडे गृहखातेही असल्याने त्यांच्या हस्ते पोलिसांना तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या उपक्रमाची सुरवात होत आहे, हे औचित्यपूर्ण आहे. "सकाळ'च्या या उपक्रमाचे आपण स्वागत करतो.'' 

तांबडी जोगेश्‍वरी मंडळातर्फे टिकार यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. मंडळाचे अनिरुद्ध गाडगीळ, सौरभ धडफळे, ऋषिकेश नेऊरगावकर आदीही या वेळी उपस्थित होते. 

कसबा गणपतीसमोरही चिक्कीवाटप 
तत्पूर्वी, पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोर चिक्कीवाटप करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस. जी. अंबुरे यांच्यासह "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मंडळाचे सल्लागार सुहास कुलकर्णी, मुरलीधर देशपांडे, नगरसेवक योगेश समेळ उपस्थित होते. 

सेनगावकर म्हणाले, ""बंदोबस्तादरम्यान पोलिसांना अडचणी येतात. त्यात त्यांना मानसिक, शारीरिक थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत पोलिसांना सकस आहार देण्याचा उपक्रम महत्त्वाचा आहे. हा उपक्रम म्हणजे पोलिस यंत्रणेबाबतची कृतज्ञता आहे. त्याची व्याप्ती वाढवून तो राज्यभर साजरा केला पाहिजे.'' 

कुलकर्णी यांनीही या उपक्रमात मंडळ नेहमीच सहभागी राहील, अशी ग्वाही दिली. मुरलीधर देशपांडे यांनी आभार मानले. 

"सकाळ'च्या पुढाकारातून राबविला जाणारा चिक्कीवाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. याच कल्पनेचा आधार घेऊन माझ्या सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना सकस आहार पुरविण्याचा उपक्रम हाती घेण्याचा विचार आहे. 
- रवींद्र सेनगावकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलिसांच्या आरोग्यासाठी "सकाळ'चा पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यात सातत्य राखले जात असून, हा उपक्रम राबविणे म्हणजे पोलिसांचा सन्मानच आहे. 
श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती मंडळ 

बारा हजार चिक्कीची पाकिटे वाटणार 
"सकाळ' आणि रोटरी क्‍लबच्या वतीने आयोजित तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमामध्ये येत्या बारा दिवसांमध्ये सुमारे बारा हजार चिक्कीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांपर्यंत ती लवकरच पोचवली जाणार आहेत.

Web Title: pune news maharashtra CM Tandurust Bandobast campaign