मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

बंगालच्या उपसागरातील मॉन्सूसची शाखा ईशान्य भारतात पोचली आहे. तेथील आसाम, मेघालय, त्रिपुरा अशा उर्वरित भागात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मॉन्सून बरसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्रात नैर्ऋत्य मौसमी पावसाला (मॉन्सून) सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

दक्षिण अरबी समुद्रातून पुढे सरकण्यासाठी मॉन्सूनला अनुकूल वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्यामुळे लक्षद्वीप, केरळ, मध्य अरबी समुद्र, कर्नाटकची किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि रॉयलसीमा येथे मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील मॉन्सूसची शाखा ईशान्य भारतात पोचली आहे. तेथील आसाम, मेघालय, त्रिपुरा अशा उर्वरित भागात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मॉन्सून बरसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्र व अरबी समुद्राच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची समुद्रसपाटीपासून दीड आणि साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगाल उपसागराच्या आग्नेय परिसरात चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले आहे. मॉन्सून पुढे सरकण्यासाठी ही स्थिती पोषक आहे. तसेच उत्तर भारतातही उत्तर प्रदेशाच्या वायव्य भाग ते आसाम आणि उत्तर प्रदेशचा उत्तर भाग व बिहारच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेशाच्या वायव्य भागाकडून बांगलादेश, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, झारखंड भागाकडे वेगाने उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे. 

सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. परिणामी या भागातील तापमानात वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मराठवाडा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप या भागात जोरदार पाऊस पडला. 

पुण्यात दुपारनंतर पावसाची शक्‍यता 
शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत कमाल तापमान 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Web Title: pune news maharashtra news monsoon arrive on thursday