महावितरणच्या वीजबिलांमध्ये सावळा गोंधळ, प्रशासन ढिम्म

जनार्दन दांडगे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागरिकांनी हे करावे 

 • मीटर रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, आयडी प्रुफ आणि रीडिंग घेतलेल्या तारखेला त्याची सही घ्यावी. 
 • रीडिंग तीस दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करावी.
 • तीस दिवसानंतर रीडिंग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची महावितरणकडे लेखी तक्रार कारवी.
 • अर्ज केल्यापासून तीस दिवसांत नवीन कनेक्शन मिळाले नसेल तर कायद्यानुसार भरपाई मागावी.
 • थकबाकी, वादग्रस्त बिलाकरिता वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी नोटीस आली आहे का, ते तपासावे.

लोणी काळभोर : महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाअंतर्गत असणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह थेऊर, कुंजीरवाडी अशा तीसहून गावातील सत्तर टक्क्याहून अधिक वीज ग्राहकांना मासिक वीज बिलांचे वाटप वेळेवर न होणे, बिलाची रक्कम अव्वाच्या सव्वा असणे, मीटरमधील रीडिंग व प्रत्यक्ष बिलाची रक्कम याचा कांहीही संबध नसणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वीज मीटरचे रीडिंग घेण्याबरोबर बिल वाटप करणाऱ्या खाजगी एजन्सीच्या कामावरचे 'महावितरण'चे नियंत्रण सुटले आहे. परिणामी एक दोन खोलीत राहणाऱ्या कामगाराला तीन हजारापासुन दहा हजार रुपयापर्यंचे बिल तर घरात दोन दोन टिव्ही, गिझर, एशी अशा सारख्या ग्राहकांना हजार पाचशेही असे शॉक देण्याचा प्रकार मागिल वर्षभरापासुन सुरू आहे. वीज कट करण्याची कारवाई टाळण्यासाठी नागरिक निमुटपणे वाढीव बिले भरत आहेत. 'आमच्या हातात काही नाही!' असे सांगून जबाबदारी झटकणारे अधिकारी आणि एजन्सींचे अप्रत्यक्ष साटेलोटे असल्याचा आरोप होत असल्याने आता यावर लगाम कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, अष्टापुर, कोरेगाव मुळ, सोरतापवाडी अशी तीसहून अधिक गावे येतात. मागिल एक वर्षभऱापासून वरील गावातील सत्तर टक्क्याहून अधिक ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक देण्याचे काम सुरु आहे. तर कांही ग्राहकांना वाढीव बिले दिली नाहीत तर त्यांना बिल भरण्याची मुदत संपल्यावंर बिले दिली जात आहेत. तर दुसरीकडे वीज बिलावरील बिल व मीटरमधील रिंडीग यांचा यतकिंचीतही संबध नसल्याची समस्या चाळीस टक्कयाहून अदिक ग्राहकांना सतावत आहेत. गर्ाहक आपल्या समस्या घेऊऩ महावितरणच्या कार्यालयात गेवल्यास, अधिकारी ग्राहकांना पटेल असे स्पष्टीकरण देत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. त्यातुनही ग्राहकास बिलाची रक्कम कमी करुन मिळाली तरी, तो आनंद पुढीूल बिलात ग्राहकाकडुन हिरावुन घेतला जातो अशी तक्रार अनेक ग्राहकांची आहे. तर दुसरीकडे वारंवार मीटरची मागणी करुणही मीटर वेळेत मिळतच नाहीत. एखाद्या ग्राहकांना वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास, मीटर रीडिंग व बिलवाटपाचे काम खाजगी एजन्सींना दिले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांच्याकडुन जबाबदारी झटकली जाते. 

नवीन मीटरमध्ये दोष
याबदद्ल अधिक माहिती देतांना महावितरणचे एक अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, मीटर रीडिंगपासून बिलवाटपाचे काम खाजगी एजन्सींना दिले आहे. त्यावर महावितरणचे नियंत्रण नाही. एजन्सींचे कर्मचारी मनमानी करतात. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत, हे जरी खरे असले तरी, मुळात नवीन बसवलेले मीटर सदोष असल्यानेच वरील समस्या वाढलेल्या आहेत. ग्राहकांच्याकडुन सध्या मीटर सदोष असल्याने, मीटर बदलुन मिळावेत असे अनेक अर्ज महावितरणकडे येत आहेत. पंचविस ते तीस टक्के मीटर सदोष असल्याच्या तक्रारीस आमचीही हा आहे. मात्र वरीष्ठ कार्यालयाकडुन येणारे मीटरच आम्हाला ग्राहकांना पुरवावे लागत असल्याने आमचा नाईलाच आहे. वरीष्ठ कार्यालकडुन येणाऱ्या मीटरची तपासनी तटस्थ यंत्रनेकडुन केल्यास व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या खाजगी एजन्सींच्यावर कारवाई केल्यास ग्राहकांच्या शंभर टक्के समस्या कमी होतील असेही संबधित अधिकाऱ्याने स्पष्ठ केले. 

बिल असे पाहावे : 

 • ग्राहक क्रमांक, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आय डी तपासून पहा. 
 • बिलाच्या मध्यभागी महिन्याचा उल्लेख आवर्जून पहा.
 • बिलिंग युनिटवर तुम्ही राहत असलेल्या भागाचा कोड नंबरची नोंद करून ठेवा.
 • दर संकेत  - घरगुती,  सार्वजनिक सेवा, व्यावसायिक, औद्योगिक हे काळजीपूर्वक पाहावे.
 • चालू रीडिंग, मागील रीडिंग, मीटरचे छायाचित्र योग्य आहे का, ते तपासा.
 • मोबाईल अॅपसाठी क्यूआर कोड डाऊनलोड करून घ्या.
 • स्थिर, वीज, वहन, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क नियमानुसार आकारले आहे का ते तपासा.

विजेचे घरगुती दर (प्रति युनिट) : 
० ते १०० युनिट :
तीन रुपये
१०१ ते ३०० युनिट : सहा रुपये ७३ पैसे
३०१ ते ५०० युनिट : नऊ रुपये सात पैसे
५०१ ते १००० युनिट : ११ रुपये दोन पैसे
१००० युनिटच्या पुढे : १२ रुपये ४८ पैसे

असा आहे महावितरणचा कारभार :

 • नियमित मीटर रीडिंग न घेणे
 • चुकीच्या रीडिंगप्रमाणे बिले आकारणे
 • नादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे
 • नवीन वीजजोड वेळेत न मिळणे
 • खाजगी एजन्सींवर नियंत्रण नसणे
 • लावरच्या मीटरचे छायाचित्र बहुतांशवेळी खराब येणे
 • छायाचित्रामध्ये बिलावरील रीडिंग स्पष्ट दिसत नाही
 • दुरुस्त करण्याऐवजी संपूर्ण बिल भरण्याची सक्ती
 • तीसऐवजी चाळीस-पंचेचाळीस दिवसांनी रीडिंग
 • तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे
 • नोटीस न बजावता मीटर काढण्याची कारवाई 

www.mahadiscom.in हे संकेतस्थळ वारंवार बंद.

टोल फ्री क्रमांक १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३५ किंवा १९१२ या क्रमांकावरही फारसा प्रतिसाद नाही. 

राजकीय नेते व संघटना झोपेत...
महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाअंतर्गत असणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह थ्ऊर, कुंजीरवाडी अशा तीसहून गावातील 70 टक्क्यांहून अधिक वीज ग्राहकांना त्रासाला सोमोर जावे लागत असताना, या परिसरातील राजकीय नेते व त्यांच्या संघटना याबद्दल आवाज उठवित नसल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधीसह राजकीय कार्यकर्तेही नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरतात. मात्र सध्या निवडणुका नसल्याने या भागातील राजकीय नेते व त्यांच्या संघटना झोपी गेल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: pune news mahavitaran inappropriate electricity bills

टॅग्स