'दाद मिळणारी कला वाढवणे गायक कलावंताचे कर्तव्य'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे - पूर्वीचे श्रोते "लावणी म्हणा,' अशी फर्माईश करायचे; पण संगीतातील वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आताचे श्रोते शास्त्रीय बंदिश, अभंग, नाट्यसंगीताची फर्माईश करत आहेत. ज्या गोष्टींची मनापासून फर्माईश होते आणि ज्याला मनापासून दाद मिळते, ती कला वाढवत, पुढे घेऊन जाणे, हे गायक कलावंतांचे कर्तव्यच आहे, अशा शब्दांत संगीतातील बदलांबाबत गायक महेश काळे याने लक्ष वेधून घेतले. 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला "पुणे डॉक्‍टर्स असोसिएशन'च्या वतीने "सुरोत्सव' ही मैफल आयोजिण्यात आली आहे. यानिमित्त महेश आणि राहुल देशपांडे हे तरुणाईचे लाडके गायक अनेक दिवसांनी एकत्र एका मंचावर येत आहेत. त्यांचे एकत्रित गायन आणि संगीतातील त्यांचे वेगवेगळे प्रयोग अनुभवण्याची संधी श्रोत्यांसाठी चालून आली आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी (ता. 15) सायंकाळी सहा वाजता ही मैफल होणार आहे. 

महेश म्हणाला, ""नवनवीन प्रयोग करत असल्यामुळेच श्रोत्यांची भरभरून दाद मिळत आहे; पण हे प्रयोग करताना जुन्या गोष्टींना आम्ही अजिबात धक्का लावत नाही किंवा संगीताचे शास्त्र बदलूनही काही करत नाही. आजच्या पिढीला काय रुचकर वाटते, याचा विचार करून नवनवे प्रयोग करत राहतो आणि तेच तुमच्यासमोर सादरही करत राहतो. "कट्यार'नंतर तर शात्रीय संगीताला कलाटणीच मिळाली आहे.'' 

राहुलबद्दल बोलताना महेश म्हणाला, ""आम्हा दोघांत मैत्रीचे नाते आहे. बरेच मित्र एकत्र चित्रपटाला जातात. फिरायला जातात. तसे आम्ही गाण्यात रमतो. त्यामुळे "सुरोत्सव' या मैफलीली मैत्रीचा स्पर्श झालेली, मैत्रीचा ओलावा असलेली "लाइव्ह मैफल' म्हणता येईल.'' 

Web Title: pune news mahesh kale