मातृत्वशक्तीचा शनिवारी होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नामवंतांच्या उपस्थितीत रंगणार ‘माझी आई’ पुस्तक प्रकाशन सोहळा
पुणे - विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांनी कथन केलेली आपल्या आईची कहाणी ‘सकाळ प्रकाशना’च्या ‘माझी आई’ पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस येत आहे. 

नामवंतांच्या उपस्थितीत रंगणार ‘माझी आई’ पुस्तक प्रकाशन सोहळा
पुणे - विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांनी कथन केलेली आपल्या आईची कहाणी ‘सकाळ प्रकाशना’च्या ‘माझी आई’ पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस येत आहे. 

डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, द. मा. मिरासदार, शि. द. फडणीस अशा ज्येष्ठ नामवंतांच्या लिखाणाबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, महेश काळे, वीणा पाटील, विष्णू मनोहर अशा विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींच्या लेखांचा समावेश या पुस्तकात आहे. या प्रत्येकाच्या जीवनातले आईचे अनन्यसाधारण स्थान, आईने केलेले संस्कार, कुटुंबाने दिलेली शिकवण आणि त्या मुशीतून तावून सुलाखून झालेली या मान्यवरांची घडण मुळापासून वाचण्यासारखी आहे. कालानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले ‘आईपण’ याचे दर्शन वाचकांना या पुस्तकातून घडेल.

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या प्रकाशकीय मनोगतामुळे या पुस्तकाच्या वाचनीयतेत भर पडली आहे. 

आजच्या तरुणाईला आणि विद्यार्थी वर्गाला प्रेरणादायी ठरणाऱ्या ‘माझी आई’ पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (ता. १०) सायंकाळी ६ वाजता लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते व पुस्तकातील नामवंत लेखकांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने उपस्थित मान्यवर लेखक त्यांच्या आई विषयीच्या आठवणींना उजाळा देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

‘माझी आई’ पुस्तकाची किंमत १५० रुपये असून प्रकाशन स्थळी हे पुस्तक आणि ‘सकाळ प्रकाशना’ची अन्य वाचनीय पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. ही पुस्तके ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात, सर्व आवृत्त्यांच्या कार्यालयांत तसेच, महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

ऑनलाइन खरेदीसाठी -  www.sakalpublications.com  किंवा amazon.in
अधिक माहितीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन- ८८८८८४९०५० किंवा ०२०-२४४०५६७८ (कार्यालयीन वेळेत.)

Web Title: pune news majhi aai bokk publication